IPL 2023, M S Dhoni | ‘कॅप्टन कूल’ धोनी याला दुखापत महागात, संपूर्ण मोसमातून आऊट?
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला आयपीएलच्या 16 व्या मोसमातील गुजरात विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विकेटकीपिंग करताना दुखापत झाली. याबाबत आता चेन्नईच्या हेड कोचने मोठी अपडेट दिली आहे.
मुंबई | आयपीएल 2023 सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातचा चेन्नईवर मिळवलेला हॅटट्रिक विजय ठरला. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात गुजरातचा विजय झाला. मात्र त्यापेक्षा अधिक चर्चा ही चेन्नई आणि पर्यायाने ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी याची झाली. या संपूर्ण सामन्यादरम्यान चाहते मैदानात धोनी धोनी असा जयघोष करत होते. धोनीच्या घोषणांनी क्रिकेट चाहत्यांनी मैदान दणाणून सोडला. मात्र सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात एक चिंताजनक बातमी समोर आली. त्यामुळे चेन्नई आणि धोनी चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.
नक्की काय झालं?
सामन्यातील दुसऱ्या डावात गुजरातची बॅटिंग होती. गुजरातच्या बॅटिंगमधील 19 वी ओव्हर दीपक चाहर टाकत होता. चाहरने टाकलेला चेंडू रोखण्यासाठी विकेटकीपर धोनी याने डाईव्ह मारली. धोनीला बॉल रोखण्यात यश आलं नाही. तो बॉल गुजरातचा बॅट्समन राहुल तेवतिया याच्या पॅडला लागला होता. त्यामुळे गुजरातच्या धावसंख्येत 4 जोडल्या गेल्या. धोनीला डाईव्ह मारल्यानंतर वेदना झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावरुन दिसून येत होतं. धोनीने पटकन आपले पाय धरले. त्यानंतर धोनी स्वत: सावरत उभा राहिला. काही वेळ धोनी अस्वस्थ दिसून आला. मात्र धोनी मैदानातून बाहेर न जाता विकेटकीपिंग करत राहिला.
धोनीच्या दुखापतीवर मोठी अपडेट
दरम्यान सामन्यानंतर धोनीच्या दुखापतीवर चेन्नईचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी मोठी अपडेट दिली आहे. धोनीला या मोसमाआधची गुडघ्याचा त्रास जाणवत होता. “धोनी या स्पर्धेआधीच गुडघेदुखीचा जाचाने त्रस्त होता. धोनी आता हा 15 वर्षांपूर्वी इतका चपळ राहिला नाही, मात्र तो आताही दिग्गज कर्णधार आहेच. तो अजूनही आक्रमक बॅटसमन आहे. धोनीला त्याची जमेची बाजू माहिती आहे”, असं स्टीफन फ्लेमिंग म्हणाले.
धोनीचा महारेकॉर्ड
धोनीने या सामन्यात 14 धावांची नाबाद खेळी केली. धोनीने या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार खेचला. यासह धोनीने मोठा रेकॉर्ड केला. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना 200 सिक्सचा टप्पा पूर्ण केला.
सामन्याचा वेगवान आढावा
दरम्यान 16 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऋतुराज गायकवाड याने केलेल्या 92 धावांच्या जोरावर चेन्नईने गुजरातला विजयासाठी 179 रन्सचं टार्गेट दिलं. गुजरातने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वात जास्त 63 धावा केल्या. तर राहुल तेवतिया आणि राशिद खान या जोडीने अखेरच्या क्षणी काही फटके मारत गुजरातला विजय मिळवून दिला.