IPL 2023 CSK vs DC : चेन्नईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवताच महेंद्रसिंह धोनीची मराठमोळ्या खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप, म्हणाला..
आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा चेन्नई सुपर किंग्स हा दुसरा संघ आहे. दिल्ली कॅपिटल्सला 77 धावांनी पराभूत करत चेन्नईने आपलं स्थान निश्चित केलं आहे. या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीने मराठमोळ्या खेळाडूचं कौतुक केलं.
मुंबई : आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्सने 12 वेळा प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाला 77 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. चेन्नईची धावगती चांगली असल्याने दुसऱ्या स्थानी कायम राहील असंच चित्र आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये चेन्नईचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध असणार आहे. साखळी फेरीत संघातील खेळाडूंची कामगिरी पाहून महेंद्रसिंह धोनी खूश झाला आहे. त्याने सामना पार पडल्यानंतर मराठमोळ्या तुषार देशपांडेचं कौतुक केलं आहे. इतकंच काय तर त्याचा डेथ ओव्हरमधील आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे, असं देखील सांगण्यास विसरला नाही.
चेन्नई सुपर किंग्स संघात ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे आणि तुषार देशपांडे हे मराठमोळे खेळाडू आहेत. ऋतुराज आणि अजिंक्यने फलंदाजीतून कमाल दाखवली आहे. तर डेथ ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने चांगली कामगिरी केली आहे.
“विजयाचं असं कोणतं गणित नाही. प्रयत्न करा, चांगले खेळाडू संघात निवडा आणि त्यांना सर्वोत्तम देण्यासाठी योग्य संधी द्या. तसेच जे लोकं सक्षम नाहीत त्यांना तयार करा. संघासाठी कुणालातरी त्याग करावा लागतो. संघ व्यवस्थापनालाही श्रेय द्यावे लागेल ते कायम आमच्या पाठिशी उभे राहिले आहेत.” असं महेंद्रसिंह धोनी याने सांगितलं.
“खेळाडूंशिवाय विजय शक्य नाही. माझ्या मते, डेथ बॉलिंग खूप महत्त्वाची आहे. तुषारने दबाव असताना चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्या गाठीशी चांगला आत्मविश्वास आहे. तो सक्षमपणे आपली भूमिका बजावत आहेत. प्लेऑफमध्ये आम्ही चांगली करू.”, असं महेंद्रसिंह धोनी यांने पुढे सांगितलं. तुषार देशपांडे याने 14 सामन्यात 20 गडी बाद केले असून गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. 45 धावा देत 3 गाडी बाद ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी राहिली आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसोव, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना