Nitish Rana | नितीश राणा याच्यासाठी वाईट बातमी, बीसीसीआयकडून मोठी कारवाई, नक्की काय झालं?
कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. मात्र त्यानंतरही कॅप्टन नितीश राणा याच्यासह केकेआर टीमला मोठा झटका लागला आहे.
तामिळनाडू | कोलकाता नाईट रायडर्स टीमने रविवारी 14 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात चेपॉक स्टेडियममध्ये 6 विकेट्सने पराभव केला. चेन्नईने विजयासाठी दिलेलं 145 धावांचं आव्हान केकेआरने 18.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केकेआरची 145 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. चेन्नईने केकेआरला 4.3 ओव्हरमध्ये 3 झटके दिले. त्यामुळे केकेआरची 33 बाद 3 अशी स्थिती झाली. इथून रिंकू सिंह आणि कॅप्टन नितीश राणा या जोडीने केकेआरला तारलं.
केकेआरसाठी रिंकू-राणा जोडीने निर्णायक भागीदारी करत केकेआरला जिंकवलं. या दरम्यान रिंकूने अर्धशतक पूर्ण केलं. हीच जोडी केकेआरला विजयापर्यंत पोहचवते असं वाटत होतं. मात्र त्याआधी रिंकू रनआऊट झाला. रिंकूने 43 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर मैदानात आंद्रे रसेल आला. नितीश आणि रसेल या दोघांनी केकेआरला विजयापर्यंत पोहचवलं. रसेलने 2 आणि राणाने नाबाद 57 धावांची विजयी खेळी केली. नितीशने केकेआरच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मात्र या विजयानंतर नितीशवर बीसीसीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
नितीश राणा याने ओव्हर रेट कायम न राखल्याने त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक खेळाडूच्या मानधनातून 6 लाख रुपये कापण्यात आले आहेत. नियमांनुसार सामन्यादरम्यान ठराविक वेळेत तेवढ्या ओव्हरचा खेळ होणं अपेक्षित असतं. मात्र तसं न झाल्यास बीसीसीआय जबाबदार व्यक्ती म्हणून कर्णधारावर दंडात्मक कारवाई करते.
चेन्नईवर 11 वर्षांनी विजय
दरम्यान केकेआरने चेन्नईचा घरच्या मैदानात तब्बल 11 वर्षांनी विजय मिळवला. याआधी केकेआरने गौतम गंभीर याच्या नेतृत्वात पहिल्यांदा 2012 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा केकेआरने अंतिम सामन्यात चेन्नईचा एम ए चिदंबरम स्टेडयिममध्ये पराभव केला होता. त्यानंतर आता 14 मे रोजी नितीशच्या कॅप्टन्सीत केकेआरने हा कारनामा करुन दाखवला.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.