Rishabh Pant | ऋषभ पंत याची आयपीएल 2023 आधी कमबॅकची घोषणा, व्हीडिओ व्हायरल
"हळुहळु सर्व सरावात बिजी झाले कारण क्रिकेट सिजन सुरु होणार. मग तेव्हा मला वाटलं की सर्व खेळतायेत तर मी का नाही!" जाणून घ्या पंतने या व्हीडिओत कमबॅकबाबत नक्की काय काय म्हटलंय.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला आता मोजून काही तास शिल्लक आहेत. त्याआधी स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हीडिओतून ऋषभ पंत याने मी क्रिकेटच्या मैदानात परतत असल्याची मोठी घोषणा केली आहे. पंतने आपला एक व्हीडिओ ट्विट केला आहे. यातून आपण परतत असल्याचं त्याने म्हटलंय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पंत गेल्या अनेक महिन्यांपासून अपघातामुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पंतचा डिसेंबर 2022 मध्ये रस्ते अपघात झाला होता. यातून तो सुदैवान वाचला. आता तो सावरतोय.
पंतच्या अपघातानंतर त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढलीय. मात्र पंतला आणखी काही महिन्यांचा कालावधी हा पूर्णपणे बरं व्हायला लागणार आहे. यामुळे पंतला आणखी काही दिवस क्रिकेटपासून दूर रहावं लागणारंय. पण या व्हीडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा फुल्ल ऑन उत्सुकता पाहायला मिळतेय.
पंतने व्हीडिओत काय म्हटलंय?
पंतने शेअर केलेल्या व्हीडिओत म्हटलंय की, “मी 2 गोष्टींशिवाय राहू शकत नाही, ते म्हणजे क्रिकेट आणि जेवण. मी गेल्या 2 महिन्यांपासून क्रिकेट खेळू शकलो नाही. मात्र लवकर बरं व्हायचं असेल तर चांगला आहार घ्या, असा सल्ला डॉक्टरने दिला”.
“मग हळु हळु सर्व सरावाला लागले, कारण क्रिकेट सीजनला सुरुवात होणार होती. तेव्हा मला वाटलं की सर्व खेळतायेत तर मी का नाही खेळायचं? तर मी आताही गेममध्ये आहे बॉस, मी येतोय खेळायला”, असं म्हणत पंतने कमबॅकचे संकेत दिलेत. तसेच ही कमबॅकची वेळ आहे असंही पतंने व्हीडिओ पोस्ट करताना म्हटलंय. दरम्यान महत्वाची बाब अशी की पंत क्रिकेटच्या मैदानात परतणार नसून हा प्रमोशनल व्हीडिओ आहे. पंतला पूर्णपणे बरं होऊन मैदानात परतण्यासाठी आणकी काही महिन्यांचा वेळ लागू शकतो.
डेव्हिड वॉर्नर कर्णधार
टीमचा नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अपघातामुळे नेतृत्वाची जबाबदारी ही डेव्हिड वॉर्नर याला देण्यात आली आहे. या जबाबदारीसाठी वॉर्नरने टीम मॅनेजमेंटचे आभार मानले आहेत. वॉर्नरला कर्णधारपदाचा पुरेसा अनुभव आहे. दिल्ली या मोसमातील आपला पहिला सामना हा शनिवारी 1 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे.
टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमैन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.