IPL 2023 : लखनऊ संघाने 347 दिवसांनंतर काढला ‘तो’ हुकमी खेळाडू, 10 बॉलमध्ये चोपल्या 46 धावा!
लखनऊ संघाचा पराभव झाला असला तरी आजच्या सामन्यामध्ये त्यांनी आपल्या ताफ्यातील हुकमी खेळाडूला मैदानात उतरवलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूने आपली ताकद दाखवून दिली आहे.
मुंबई : IPL च्या 16 मोसमात 10 पेक्षा जास्त सामने झाले तरी अद्यापही सर्व संघ प्ले ऑफच्या शर्यतीमध्ये आहेत. आज रविवारी दुपारी गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये लखनऊ संघाचा गुजरातने 56 धावांनी पराभव केला आहे. लखनऊ संघाचा पराभव झाला असला तरी आजच्या सामन्यामध्ये त्यांनी आपल्या ताफ्यातील हुकमी खेळाडूला मैदानात उतरवलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूने आपली ताकद दाखवून दिली आहे.
कोण आहे हा खेळाडू?
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आहे. लखनऊने त्याला 347 दिवसांनंतर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात त्याने 70 धावांची दमदार खेळी खेळली. यादरम्यान क्विंटनने 41 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारले. यामधील अवघ्या 10 चेंडूत केवळ चौकार आणि षटकारांनी 46 धावा केल्या. गेल्या वर्षी एलिमिनेटर सामन्यात तो शेवटचा RCB विरुद्ध खेळताना दिसला होता. त्यामध्ये त्याने 6 धावा केल्या होत्या. संघाचाही त्यावेळी पराभव झाला होता.
गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट्स सामना-
या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 227 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये शुबमन गिल नाबाद (94), वृद्धीमान साहा (81) धावांची खेळी केली होती. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ संघानेही कमाल सुरूवात केली होती. क्विंटन डी कॉक आणि काइल मेयर्स यांनी 88 धावांची सलामी करून देत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
मोहित शर्माने ही भागीदारी मोडली. काईल मेयर्स (48) धावांवर रशीद खानकडे झेलबाद झाला. मेयर्सने 32 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. डिकॉकने आपला दांडपट्टा चालू ठेवला होता. मात्र 16 व्या ओव्हरमध्ये करामती खान म्हणजे राशिद खान याने त्याला 70 धावांवर असतान बोल्ड आऊट केलं. के. एल. राहुलनंतर त्याच्याजागी क्विंटन डी कॉकला संधी मिळाली आहे.