IPL 2023 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! ऐन मोक्याची क्षणी दिग्गज खेळाडूने घेतला साथ सोडण्याचा निर्णय
आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आतापर्यंतच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे. मात्र असं असताना दिग्गज खेळाडू आयपीएल स्पर्धा मध्यातच सोडणार आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सने 10 पैकी 7 सामने जिंकत अव्वल स्थान पटकावलं आहे. 14 गुण आणि 0.752 च्या रनरेटसह हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ पहिल्या स्थानी आहे. आयपीएल 2022 स्पर्धेत गुजरातनं जेतेपद पटकावलं होतं. यंदाही गुजरातची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक संघ आहे. असं असताना साखळी फेरीतील उर्वरित सामने आणि प्लेऑफपूर्वीत वेगवान गोलंदाजाने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जोशुआ लिटलने देशासाठी आयपीएल स्पर्धा काही दिवसांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जोशुआ लिटलला आयर्लंड संघात स्थान मिळालं आहे. ही वनडे मालिक 9 मे पासून सुरु होणार आहे. 14 मे रोजी बांगलादेश विरुद्धची मालिका संपणार आहे. त्यानंतर तो पुन्हा गुजरात टायटन्स ताफ्यात रुजू होणार आहे. गुजरातचा पुढता सामना 7 मे रोजी लखनऊसोबत आहे. तर 12 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध लढत असणार आहे.
“आम्ही त्याला शुभेच्छा देतो की आपल्या देशासाठी खेळण्यासाठी जात आहे.त्याची आयपीएलमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. वनडे मालिका संपल्यानंतर तो पु्न्हा येईल.”, असं गुजरात टायटन्सचे डायेरक्टर विक्रम सोलंकी यांनी सांगितलं.
जोशुआ लिटलची आतापर्यंत दहा सामन्यातील कामगिरी
- चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 41 धावा देत 1 गडी बाद केला.
- दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 27 धावा दिल्या. एकही गडी बाद केला नाही.
- कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 45 धावा देत 1 गडी बाद केला.
- पंजाब विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 31 धावा देत 1 गडी बाद केला.
- राजस्थन आणि लखनऊ विरुद्धच्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता.
- मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 2 षटकात 18 धावा दिल्या. एकही गडी टिपता आला नाही.
- कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 25 धावा देत 2 गडी बाद केले.
- दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 3 षटकात 27 धावा दिल्या. एकही गडी बाद करता आला नाही.
- राजस्थान विरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 24 धावा देत एक गडी बाद केला.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.