मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफचं गणित वाटतं तितकं सोपं नाही. टॉपवर असलेल्या गुजरातपासून तळाशी असलेल्या दिल्लीला अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे कधी कसं चित्र बदलेल सांगता येत नाही. आता मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. काल परवापर्यंत मुंबई इंडियन्स संघ टॉप पाचमध्ये सुद्धा नव्हता. पाठच्या काही सामन्यांमुळे गुणतालिकेचं चित्रच पालटलं आहे. त्यामुळे आता आरसीबीला पराभूत केल्यानंतर मुंबईचं प्लेऑफमधलं स्थान कसं निश्चित होणार जाणून घ्या.
आयपीएल 2023 स्पर्धेतील साखळी फेरीत प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. त्यापैकी मुंबई इंडियन्सचे 11 सामने खेळून झाले आहेत. सहा सामन्यात विजय, तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मुंबई इंडियन्स 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पण इथेच हे गणित संपत नाही. पुढच्या काही सामन्यांवर प्लेऑफचं गणित ठरणार आहे.
मुंबईचे उर्वरित तीन सामने गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यासोबत आहेत. तिन्ही सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर 18 गुणांसह प्लेऑफमधलं स्थान निश्चित होईल.
मुंबई इंडियन्सचा तीन पैकी दोन सामने टॉप 4 मधल्या दोन संघांशी आहेत. त्यामुळे एक पराभवही गणित बिघडवू शकते. गुजरातला फक्त एक सामना जिंकायचा आहे. चेन्नईला दोन सामने आणि लखनऊ सुपर जायंट्सला तीन सामने जिंकायचे आहेत. तर त्यांचं प्लेऑफमधलं स्थान निश्चित होणार आहे.
सध्या टॉप 4 मधल्या संघापैकी एका संघाने एक जरी सामना गमावला तर राजस्थान, कोलकाता, आरसीबी आणि पंजाबला संधी मिळेल. त्यामुळे मुंबईला गुजरात विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा गणित पॉइंट टेबल ऐवजी नेट रनरेटवर येईल.
टॉप 4 मधल्या संघापैकी एका संघाने दोन सामने गमावले तर सनराईजर्स हैदराबाद आणि दिल्लीलाही संधी आहे. त्यामुळे यापुढे होणारे सामने प्लेऑफचं गणित स्पष्ट करतील. मुंबईचं बोलायचं झालं तर सद्यस्थितीला तिन्ही सामने जिंकावेच लागतील.
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामना पावसामुळे रद्द झाल्याने प्रत्येकी एक गुण वाटून दिला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना फायदा झाला आहे. त्यामुळे मुंबईला काहीही करून तिन्ही सामने जिंकायचे आहे हे आता गुणतालिकेवरून सांगता येईल. जसे सामने होतील तसं हे चित्र आणखी स्पष्ट होईल.