Cricket | टीममधील मोठा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, टेन्शन वाढलं, आता कसं होणार?
आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूला दुखापत झाल्याने पुढील 6 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई | आयपीएल 16 वा मोसम आता ऐन रंगात आला आहे. साखळी फेरीतील अवघे काही सामने बाकी आहेत. या 16 व्या सत्रात 59 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन पार पडलंय. मात्र अजूनही एकाही टीमला प्लेऑफमध्ये एन्ट्री मारता आलेली नाही. त्यामुळे आता 4 जागांसाठी दिल्ली कॅपिट्ल्सचा अपवाद वगळता इतर संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या पर्वा दरम्यान टीम इंडियाच्या आणि इतर संघाच्या खेळाडूंना फिल्डिंग दरम्यान आणि कॅच घेण्याचा प्रयत्नात जबर दुखापत झाली. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएल 16 व्या मोसमातून बाहेर पडावं लागलं.
केन विलियमसन याने बाउंड्री लाईनवर कॅच घेण्याच्या नादात उडी घेतली. त्यामुळे केनला दुखापत झाली. ही दुखापत इतकी भंयकर होती, की त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं. तर 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला आरसीबी विरुद्ध फिल्डिंग करताना त्रास जाणवला. केएल धावता धावता मैदानात पडला. त्यानंतर केएलला सहकाऱ्यांच्या खांद्याचा आधार घेत मैदानातून बाहेर व्हावं लागलं. केएल यामुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधूनही बाहेर पडला आहे.
केन आणि केएल यांच्यानंतर आता तिसरा खेळाडू हा फिल्डिंग दरम्यान दुखापतीचा शिकार झाला आहे. केनप्रमाणे हा खेळाडू कॅचच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त होऊन बसला. त्यामुळे आता या खेळाडूला पुढील 6 आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आगामी आशिया कप स्पर्धेआधी हा खेळाडू कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
बांगलादेश क्रिकेट टीमचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याला दुखापत झाली आहे. शाकिबच्या बोटाला दुखापत झाली आहे. आयर्लंड विरुद्ध बांगालदेश यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकतील पहिला सामन्याचा निकाल पावसामुळे लागू शकला नाही. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने 3 विकेट्सने विजय मिळवला.
तर दुसरा सामना शुक्रवारी 12 मे रोजी पार पडला. या सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली. शाकिबने आयर्लंडत्या जॉर्ज डॉकरेल याचा कॅच सोडला. शाकिबला या दरम्यान ही दुखापत झाली. शाकिबला या दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून मुकावं लागलं. आता शाकिबला आगामी 6 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
तिसरा आणि निर्णायक सामना
दरम्यान आयर्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात वनडे सीरिजमधील तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना खेळवण्यात येत आहे. बांगलादेश या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर आयर्लंडला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात काय होतं, याकडे लक्ष असणार आहे.