मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडिअन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यामध्ये लखनऊच्या मोहसीन खान याने टाकलेल्या अफलातून ओव्हरमुळे लखनऊ संघाने विजय मिळवला. हा सामना प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्याकरता दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. आता लखनऊने विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईने हातातील सामना गमावल्यानंतर रोहित शर्माने पाहा कोणावर पराभवाचं खापर फोडलं आहे.
सामना जिंकण्यासाठी जसा पाहिजे तसा खेळ आम्ही केला नाही. अनेक छोट्या-छोट्या संधी आल्या होत्या मात्र त्याचं विजयामध्ये रूपांतर करता आलं नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यायोग्यही होती. मात्र दुसऱ्या हाल्फमध्ये आम्ही सामना गमावला. यासोबतच गोलंदाजीवेळी शेवटच्या 3 ओव्हर महागात पडल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
लखनऊच्या दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही सुरूवात एकदम झकास केली होती. दुसऱ्या हाल्फमध्ये सामना आमच्या हातातून निसटला. स्टॉयनिसने शानदार खेळी केली होती, नेट रनरेटबद्दल अजुन काही विचार केला नाही. आता सनराइजर्स हैदराबादविरूद्ध्या सामन्यात उत्तम खेळ करावा लागेल, असंही रोहित शर्मा याने सांगितलं.
दरम्यान, लखनऊने या विजयासह प्लेऑफची दावेदारी अजून मजबूत केली. तर आता मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.