Virat Kohli Gautam Gambhir | विराट-गंभीर यांच्यात जोरदार वाजलं, नक्की कारण काय?

| Updated on: May 02, 2023 | 12:42 AM

विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्ये लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर कडाक्याचा वाद झाला. या वादाचं नक्की कारण काय, काय झालं होतं?

Virat Kohli Gautam Gambhir | विराट-गंभीर यांच्यात जोरदार वाजलं, नक्की कारण काय?
Follow us on

लखनऊ | लखनऊ सुपर जायंट्स टीमने 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला एम चिन्नास्वामी या घरच्या मैदानात शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं होतं. लखनऊने तेव्हा 1 विकेटने आरसीबीवर विजय मिळवला होता. तेव्हा लखनऊचा कोचिंग स्टाफचा सदस्य गौतम गंभीर याने मैदानात येऊन आरसीबीच्या चाहत्यांकडे पाहून तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं होतं. आरसीबीच्या पराभवावर गंभीरने मीठ लावण्याचा प्रकार केला होता. आरसीबीच्या डोक्यात घरच्या मैदानात पराभूत झाल्याचा संताप, राग चिड होता. सोमवारी 1 मे रोजी हे दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले. आरसीबीने पहिले बॅटिंग करताना अवघ्या 126 धावाच केल्या. त्यामुळे लखनऊला 127 धावांचं आव्हान मिळालं.

मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी अफलातून पद्धतीने गोलंदाजी केली. आरसीबीने लखनऊला पावर प्लेमध्येच 4 झटके दिले. त्यानंतर ठराविक अंतराने धक्के देणं सुरुच ठेवलं. कॅप्टन केएल राहुल याला दुखापतीमुळे विशेष काही करता आलं नाही. या लो स्कोअरिंग सामन्यात एकाही फलंदाजाला टीमच्या विजयाची जबाबदारी घेता आली नाही.

हे सुद्धा वाचा

आरसीबीने एकाही बॅट्समनला मोठी खेळी करुन दिली नाही. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 127 धावांचं आव्हान लखनऊला पेलता आलं नाही. आरसीबीच्या गोलंदाजांनी लखनऊला 19.5 ओव्हरमध्ये 108 गुंडाळलं. आरसीबीने यासह लखनऊचा 18 धावांनी मात करत मागील पराभवाचा वचपा घेतला.

सामन्यादरम्यान विराट कोहली आक्रमकपणे विकेटचा सेलिब्रेट करत होता. आता लखनऊला घरच्या मैदानात पराभूत केल्यानंतर शांत राहिल तो विराट कसला. विराट गौतम गंभीरला पाहून आणखी चेकाळला. विराटने गंभीर प्रमाणे लखनऊच्या चाहत्यांना तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा सल्ला दिला.

यानंतर परंपरेनुसार दोन्ही टीम हस्तांदोलनसाठी आले. गेल्या सामन्यात विराट आणि गंभीरचं मनोमिलन झालं होतं. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं, मीठी मारली होती. मात्र राग दोघांच्याही डोक्यात होताच. आता या वेळेस हस्तांदोलन करताना एकमेकांनी दोघांचे हात झटकले. इतकं कमी की काय पुढे लखनऊच्या नवीन उल हक आणि विराट या दोघांमध्ये झकाझकी झाली. दोघांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली. या दोघांमध्ये सहकारी खेळाडूंनी बचाव करत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र इथेच ठिणगी पडली.

आता इतका राडा झाल्यावर गंभीर तरी कसा मागे राहिल, तो पण आला मैदानात. झालं शेवटी विराट आणि गंभीर भिडले. दोघांनीही झालेली हकीकत सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही गरम झालेले. दोघांमध्ये मारामारी होते की काय, असंच क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं. विराटच्या बाजूने पूर्ण आरसीबीची टीम, गंभीरच्या पाठीशी लखनऊची टीम. मधोमध अमित मिश्रा उभा होता. मात्र दोघांमध्ये खटके उडण्याआधी मिश्राने यशस्वी मध्यस्थी केली. ज्यामुळे पुढचा अनर्थ टळला. या सर्व घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र या दोघांच्या अशा वागणुकीमुळे क्रिकेटची प्रतिमा पुन्हा डागळली इतकं मात्र निश्चित.

विराट आणि गौतम गंभीर यांच्यात वाद

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), कायल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा आणि यश ठाकूर.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवुड.