मुंबई : टीम इंडियाचा स्टार वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीचा सामना करतोय.
या दुखापतीमुळे बुमराहला गेल्या अनेक मालिकांना मुकावं लागलं आहे. बुमराह याची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठीही निवड करण्यात आली नाही. मात्र या दरम्यान बुमराह आयपीएल 2023 च्या स्पर्धेतून कमबॅक करेल, असं म्हटलं जात होतं. मात्र या दरम्यान बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आयपीएलच्या 16 व्या मोसमाबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सुरुवात ही 31 मार्चपासून होणार आहे. तर 28 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, बुमराह याला एनसीएतून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे बुमराह आयपीएल 2023 मध्ये खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही.
बुमराहला टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या आधी पाठदुखीच्या त्रास झाला होता. बुमराह तेव्हापासून दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएत मेहनत घेतोय. या दरम्यानच्या काळात बुमराहला आणखी एक दुखापत झाली. त्यामुळे बुमराहचं कमबॅक रखडत गेलं. बुमराह अजून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरु इथे दुखापतीवर मेहनत घेतोय.
बुमराह याने एनसीएत गेल्या 10 दिवसांपासून सराव सामन्यांमध्ये सहभागी झालेला नाही. बीसीसीआय सातत्याने बुमहारच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
बीसीसीआय बुमराहबाबत फार अलर्ट आहे. कारण अगदी काही महिन्यांवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धा येऊन ठेपली आहे. तर याआधी आयपीएलचा 16 वा मोसमही आहे.
बुमराह टीम इंडियाच्या बॉलिंग डिपार्टमेंटचा हेड आहे. त्यामुळे या 2 महत्वाच्या स्पर्धेआधी बीसीसीआय बुमराहबाबत कोणतीही जोखीम घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे बुमराह लवकरात लवकर बरा होऊन आयपीएलच्या 16 व्या मोसमाठी फिट व्हावा अशीच इच्छा मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटकडून केली जात आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.