Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडून मोठा रेकॉर्ड उधवस्त, या दिग्गजाला पछाडलं
मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. त्याने 20 धावांची खेळी केली मात्र मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या हंगामातील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. मुंबईने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कोलकाताने मुंबईला व्यंकटेश अय्यर याच्या 104 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 186 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोघांच्या वादळी खेळीच्या मदतीने 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला पोटदुखीमुळे खेळता आलं नाही. रोहितचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये करण्यात आला नव्हता. मात्र रोहित इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सामन्यातील दुसऱ्या डावात मैदानात आला. रोहितला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फारशी छाप सोडता आली नाही. रोहितने 13 बॉलमध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 20 धावांची छोटेखानी केली. रोहितने या छोट्या खेळीसह मोठा कारनामा केला आहे. रोहितने पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याला पछाडत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात एका टीमविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा याने याबाबतीत शिखर धवन याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रोहितने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 1 हजार 40 धावा पूर्ण केल्या. तसेच शिखर धवन याच्या नावावर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 1 हजार 29 धावांची नोंद आहे. दिल्ली कॅपिट्ल्स टीमचा कर्णधार यानेही कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 1 हजार 18 रन्स केल्या आहेत. तर पंजाब किंग्ससमोर 1 हजार 5 धावा कुटल्या आहेत.
दरम्यान मुंबई या हंगामातील सहावा सामना हा येत्या मंगळवारी 18 एप्रिल रोजी खेळणार आहे. या सामन्यात मुंबईसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबादला पराभूत करुन विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या मानसाने मुंबई इंडियन्स या सामन्यात खेळायला उतरेल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.