Arjun Tendulkar | पंजाब किंग्स विरुद्ध अर्जुन तेंडुलकर सुपर फ्लॉप, एकाच ओव्हरमध्ये लुटवल्या 31 धावा
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर हा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. त्याने एका ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या.
मुंबई | सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सकडून खेळणारा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल पदार्पणासह सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. अर्जुनने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आपली पहिली विकेट घेतली. त्याने भुवनेश्वर कुमार याला आऊट केलं. त्यानंतर त्याचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आलं. मात्र अर्जुनला आपल्या तिसऱ्याच सामन्यात वडिलांप्रमाणे कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आलं आहे. अर्जुन पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात महागडा ठरलाय. त्यामुळे सोशल मीडियावरुन अर्जुनवर टीका करण्यात येत आहे.
अर्जुनने पंजाब किंग्सच्या डावातील 16 व्या ओव्हरमध्ये 10, 20 नाही, तर तब्बल 31 धावा दिल्या. यामुळे अर्जुन टीकेचा धनी ठरलाय. अर्जुनने या ओव्हरमध्ये एकूण 8 बॉल टाकले. अर्जुनने या ओव्हरमध्ये अनुक्रमे 6, wd,4,1,4, 6, 4nb आणि 4 अशा एकूण 31 धावा दिल्या. आपला लेक आणि भाऊ अपयशी ठरल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या दोघांचा फोटो पाहण्यासारखा आहे. दरम्यान अर्जुनने आपल्या 3 ओव्हरच्या स्पेलमध्ये 16 च्या इकॉनॉमी रेटने 48 धावा देत 1 विकेट घेतली.
पंजाबची विस्फोटक बॅटिंग
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विस्फोट पाहायला मिळाला. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना तब्येतीचा फोडून काढला आहे. सामन्याच्या 12 ओव्हरपर्यंत बरोबरीत असलेला सामना पंजाबच्या बाजूने झुकला. त्यानंतर पंजाबने मुंबईच्या गोलंदाजांची सालटी सोलून काढली. पंजाबच्या प्रत्येक फलंदाजाने मिळालेल्या संधीचा मजबूत फायदा घेत तुफान फटकेबाजी केली. हरप्रीत ब्रार याचा अपवाद वगळता पहिल्या सात फलंदाजांनी धमाका केला.
मॅथ्यू शॉर्ट याने 11, प्रभासिमरन सिंह 26, अथर्व तायडे 29, लियाम लिविंगस्टोन 10, भाटीया 41, सॅम करन 55 आणि जितेश याने 25 रन्स केल्या. तर हरप्रीत ब्रार 5 धावांवर रनआऊट झाला. तर शाहरुख खान शून्यावर नाबाद राहिला. मुंबईकडून पियूष चावला आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी प्रत्येकी सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अर्जुन तेंडुलकर, बेहरनडोर्फ आणि जोफ्रा आर्चर या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान (क), जितेश शर्मा (डब्ल्यू), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.