लखनऊ | लखनऊ सुपर जायंट्स टीमने मुंबई इंडियन्स संघावर 5 धावांनी विजय मिळवला. लखनऊने मुंबईला विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईला 20 ओव्हरमध्ये 172 धावांवरच रोखलं. या पराभवामुळे मुंबईची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ही काही टक्क्यांनी कमी झाली. मुंबईकडून इशान किशन याने सर्वाधिक 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन रोहित शर्मा याने 37 धावा जोडल्या.
सूर्यकुमार यादव याने निराशा केली. सूर्या 7 धावांवर आऊट झाला. नेहलर वढेरा 16 धावा करुन माघारी परतला. विष्णू विनोद याने 2 रन्स केल्या. तर कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड ही जोडी नाबाद परतली. या जोडीने अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र अवघ्या 5 धावांसाठी हे प्रयत्न कमी पडले. डेव्हिडने नाबाद 32 आणि ग्रीनने नॉट आऊट 4 धावा केल्या. लखनऊकडून रवी बिश्नोई आणि यश ठाकूर या जोडीने मुंबईला प्रत्येकी 2 झटके दिले. तर मोहसिन खान याने 1 विकेट घेतली.
लखनऊने या विजयासह प्लेऑफची दावेदारी अजून मजबूत केली. तर आता मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सप्रमाणे आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावं लागेल.
त्याआधी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्माने लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनऊने 3 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 177 धावा केल्या. लखनऊकडून मार्क्स स्टोयनिस याने नाबाद 89 धावा केल्या. निकोलस पूरन याने नाबाद 8 धावा करत स्टोयनिसला चांगली साथ दिली. कॅप्टन कृणाल पंड्या 49 धावांवर रिटायर्ड हर्ट झाल्याने मैदानाबाहेर गेला.
दीपक हुड्डा याने 5, क्विंटन डी कॉक याने 16 धावांचं योगदान दिलं. तर प्रेरक मंकड याला भोपळा फोडण्यातही अपयश आलं. मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफ याने 2 विकेट्स घेतल्या. तर पीयूष चावला याने 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान या निर्णायक सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे, हे आपण जाणून घेऊयात.
ऑरेन्ज कॅप आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीस याच्याकडेच कायम आहे. फाफने या ऑरेन्ज कॅपवर घट्ट पकड मिळवली आहे. ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीतील पहिल्या 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबईचा सूर्यकुमार हा पाचव्या क्रमांकावरच कायम आहे.
सूर्याला लखनऊ विरुद्ध मोठी खेळी करत वरच्या क्रमांकावर येण्याची संधी होती. मात्र सूर्याला अपयशी ठरला. सूर्या अवघ्या 7 धावा करून आऊट झाला. त्यामुळे सूर्या ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत आहे तिथेच अर्थात पाचव्या क्रमांकावर राहिला. सूर्याने आणखी काही धावा केल्या असत्या तर, सामन्याचा निकाल निश्चित वेगळा असता. मात्र यासाठी सूर्या एकटा जबाबदार नाही. मुंबईच्या इतर फलंदाजांनीही थोडी जबाबदारी घेतली असती, तर हा विजय सोपा होऊ शकला असता.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
पर्पल कॅप कुणाची?
दरम्यान पर्पल कॅपही मोहम्मद शमी याच्याकडे कायम आहे. इथेही ऑरेन्ज प्रमाणे पर्पल कॅपमध्ये बदल झालेला नाही. पहिले 5 बॉलर कायम आहेत. या मध्ये मुंबई इंडियन्सच्या पीयूष चावला याचा समावेश आहे. चावलाला अधिक विकेट्स घेऊन चौथ्यावरुन किमान तिसऱ्या स्थानी येण्याची संधी होती. मात्र चावलाला ते शक्य झालं नाही. पण चावलाने त्याचं चौथं स्थान कायम ठेवलं.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मढवाल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टोयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग आणि मोहसिन खान.