अहमदाबाद | गुजरात टायटन्स टीमने मुंबई इंडियन्स टीमवर आयपीएल क्वालिफायर 2 मध्ये 62 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातने मुंबईला विजयासाठी 234 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 18.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 171 धावाच करता आल्या. मुंबईचा या विजयासह आयपीएलमधील प्रवास इथेच संपला. तर गुजरात टायटन्स टीमने सलग दुसऱ्यांदा आयपीएल अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुबमन गिल आणि मोहित शर्मा हे दोघे गुजरात टायटन्सच्या विजयाची शिल्पकार ठरले. शुबमनने 129 धावांची शतकी खेळी केली. तर मोहित शर्मा याने 5 विकेट्स घेतल्या.
मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने 38 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. तिलक वर्मा याने 43 धावांचं योगदान दिलं. कॅमरुन ग्रीन 30 रन्स करुन माघारी परतला. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पियूष चावला याला भोपळा फोडण्यात अपयश आलं. गुजरातकडून मोहित शर्मा याने 2.2 ओव्हरमध्ये 10 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जोशुआ लिटिलने 1 पण धोकादायक कॅमरुन ग्रीन याची विकेट घेतली.
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. गुजरातकडून शुबमन गिल याने 60 बॉलमध्ये 7 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीने 129 धावांची खेळी केली. शुबमन व्यतिरिक्त गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने 18 धावा केल्या.
साई सुदर्शन 43 धावांवर दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर पडला. तर हार्दिक पंड्या याने नाबाद 28 धावा केल्या. तर राशिद खान 5 धावा करुन नाबाद परतला. मुंबईकडून आकाश मढवाल आणि पियूष चावला या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान या सामन्यानंतर ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर मोठा बदल झाला आहे. शुबमन गिल याने ऑरेन्ज कॅप पटकावली आहे. शुबमनने 9 धावा करत आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याच्याकडे असलेली ऑरेन्ज कॅप हिसकावून घेतली. त्यामुळे फाफची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि डेव्हॉन कॉनव्हे कायम आहेत.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
तर दुसऱ्या बाजूला शमीने 2 विकेट्स घेत आपली पर्पल कॅप कायम ठेवली आहे. राशिद खान यानेही 2 विकेट घेतल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. मोहित शर्मा याने 5 विकेट्स घेतल्याने त्याची तिसऱ्या स्थानी एन्ट्री झालीय. त्यामुळे पीयूष चावला याची चौथ्या क्रमांकावर घसरण झालीय.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
चौथ्या स्थानी पीयूष चावला याल्याने युझवेंद्र चहल याची पाचव्या तर तुषार देशपांडे याची सहाव्या क्रमांकावर घसरण झालीय. आता गुजरात विरुद्ध चेन्नई अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. ऑरेन्ज कॅप शर्यतीतील डेव्हॉन कॉनव्हे आणि शुबमन गिल, तर पर्पल कॅपमधील मोहम्मद शमी, मोहित शर्मा, राशिद खान आणि तुषार देशपांडे या 6 खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.