GT vs MI Qualifier 2 Rain | अहमदाबादमध्ये सामन्याआधी पाऊस, मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 सामन्याआधी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाऊसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई पलटणच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना जिंकणारी टीम अंतिम फेरीत पोहचेल. विजयी टीम अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडेल. या क्वालिफायर 2 मॅचचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी एक आणि मोठी वाईट बातमी समोर आली आहे. अहमदाबादमध्ये पाऊसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात पाऊस होतोय.
पावसामुळे मुंबई इंडियन्सला टेन्शन
या पावसामुळे मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे. कारण पावसामुळे सामना रद्द झाला, तर मुंबई सामना न खेळताच क्वालिफायर मधून आऊट होईल. तर गुजरात थेट अंतिम सामन्यात पोहचेल. त्यामुळे हा पाऊस थांबावा यासाठी पलटणने वरुणराजाला ट्विट करुन “जा रे जा रे पावसा”, असं म्हटलंय.
अहमदाबादमध्ये पाऊस
जा रे जा रे पावसा ?️?
— Mumbai Indians (@mipaltan) May 26, 2023
टॉसला पावसामुळे उशीर
आयपीएल स्पर्धेत वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता टॉस होतो. तर त्यानंतर अर्ध्या तासाने 7 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होते. मात्र आता अहमदाबादमध्ये पावसामुळे टॉसला विलंब होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. खेळपट्टी ओली झाल्याने टॉसला विलंब होणार आहे. त्यामुळे निश्चितच सामना सुरु व्हायला उशीर होईल. मिळालेल्या माहितीनुसार सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.
विलंबामुळे सामन्यातील ओव्हर कमी होणार?
हा सामना जास्तीत जास्त पावणे नऊपर्यंत सुरु झाला तर 20 ओव्हरचा पूर्ण गेम होईल. मात्र त्यानंतर पावसामुळे सामना सुरु होण्यास वेळ लागला, प्रत्येक 8 मिनिटांसाठी 1 ओव्हर कमी होत जाईल.त्यामुळे वेळेचं गणित महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सामना सुरू झाल्यानंतर पाऊस पडल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार षटक कमी करून लक्ष्य दिले जाईल.
सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी किमान पाच षटकं खेळणं गरजेचं आहे. पहिल्या डावात 10 ओव्हरचा गेम झाल्यास दुसऱ्या डावात किमान 5 ओव्हरचा गेम पूर्ण होणं अपेक्षित आहे. कारण त्यानंतरच डकवर्थ लुईस नियम लागू होईल. त्यामुळे सामन्याचा निकाला लागण्यासाठी किमान 5 ओव्हरचा खेळ होणं गरजेचं आहे. अन्यथा सुपर ओव्हरने निकाल लावला जाईल.
पावसामुळे सुपर ओव्हरही खेळवता आली नाही, तर लीग पॉइंट्सच्या आधारे विजेता ठरवला जाईल. क्वॉलिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामन्यासाठी राखीव दिवस नाही.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.