IPL 2024 Auction : भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या हेडला मिळाले फक्त इतके कोटी, हैदराबादनं घेतलं स्वस्तात
आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची कामगिरी हवी तशी राहिली नाही. एकदा जेतेपदावर नाव कोरलं खरं, पण त्यानंतर हवी तशी कामगिरी राहिली नाही. गेल्या दोन पर्वात तळाशी राहण्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे संघात चांगले खेळाडू घेण्यासाठी हैदराबादची धडपड सुरु आहे. ट्रेव्हिस हेडला घेण्यासाठी पुढाकार घेतला पण स्वस्तात मिळाला.
मुंबई : आयसीसी स्पर्धेत ट्रेव्हिस हेडने जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारताला पराभूत करण्यास ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आयपीएल 20224 मिनी लिलावात त्याचा डंका वाजेल असं प्रत्येकाला वाटत होतं. ट्रेव्हिस हेडने स्वत:ची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली होती. या रक्कमेपासून पुढे बोली सुरु झाली. ट्रेव्हिस हेडसाठी सनरायझर्स हैदराबाद आणि महेंद्रसिंह धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्समध्ये चुरस झाली. चेन्नई सुपर किंग्स त्याला संघात घेण्यासाठी पहिल्यांदा रस दाखवला. पण सनरायझर्स हैदराबाद हाती असलेली संधी सोडणार का? चेन्नईने बेस प्राईसवर थोडी अधिक रक्कम सांगताच सनरायझर्स हैदराबादने हात वर केला. त्यामुळे ही बोली वाढतच जाईल असं वाटत होतं. कारण रोवमॅन पॉवेलसाठी 7.40 कोटी मोजले तर ट्रेव्हिस हेडसाठी नक्कीच जास्त मोजले जातील, असं वाटत होतं. पण सनरायझर्स हैदराबादला हेड स्वस्तात मिळाला असंच म्हणावं लागेल.
सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये बोलीसाठी चुरस सुरु होती. पण चेन्नईने बोली लावताच हैदराबाद हात वर करून हेड किती महत्त्वाचा आहे हे दाखवून देत होते. त्यामुळे चेन्नईने आखुडता हात घेतला. अखेर 6.80 कोटीत ट्रेव्हिस हेडला संघात घेण्यात सनरायझर्स हैदराबादला यश आलं. त्यामुळे मोठी किंमत मिळेल ही आशा संपुष्टात आली. ट्रेव्हिस हेडमुळे सनरायझर्स हैदराबादला एक चांगला ओपनर मिळणार आहे. पण त्याची कामगिरी आयपीएलमध्ये कशी राहते हे येणारा काळच सांगेल.
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, शाहबा अहमद. टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंग यादव, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू सनरायझर्स संघांने कायम ठेवले आहेत.