IPL 2024 Auction : पॅट कमिन्स ठरला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू, आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत
वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद ऑस्ट्रेलियाने कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वात जिंकलं. त्यामुळे पॅट कमिन्सचा भाव वधारलेला होता. त्याला त्याच्या बेस प्राईसच्या दहापट जास्त रक्कम मिळाली आहे. खऱ्या अर्थाने त्याचं नशिब फळफळलं असंच म्हणावं लागेल. त्याच्यासाठी फ्रेंचायसीने जबरदस्त फिल्डिंग लावली होती. एक दोन नव्हे चार फ्रेंचायसी सरसावल्या होत्या.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएल लिलावातील आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजले आहे. पॅट कमिन्सनं त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली होती. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरस पाहायला मिळाली. अर्थात अष्टपैलू पॅट कमिन्स संघात आला की संघाची बाजू आणखी मजबूत होईल. त्यामुळे फ्रेंचायसींनी आपला खजाना रिता करण्यासाठी मागेपुढे पाहिलं नाही. पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने दहापट जास्त रक्कम मोजली. बेस प्राईस 2 कोटी असताना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली. ही रक्कम 12 कोटींवर गेली तेव्हा सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये चुरस निर्माण झाली. ही रक्कम पाहता पाहता 17 कोटींच्या घरात गेली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने एन्ट्री घेतली मात्र 20.50 कोटी रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली. पॅट कमिन्सपूर्वी इंग्लंडच्या सॅम करनला 18.50 कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
पॅट कमिन्स आतापर्यंत 42 आयपीएल सामने खेळला आहे. मागच्या वर्षी आयसीसी स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून त्याने माघार घेतली होती. आतापर्यंत 42 पैकी 31 सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्याने 379 धावा केल्या. तर 45 गडी बाद केले आहेत. सनरायझर्स हैदराबादची बाजू पॅट कमिन्समुळे भक्कम झाली आहे. ट्रेव्हिस हेडलाही संघात घेण्यात फ्रेंचायसीला यश आलं आहे. त्यामुळे ट्रेव्हिस हेड आणि पॅट कमिन्स जोडी हैदराबादसाठी फायद्याची ठरेल. पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद मिळू शकतं. सनरायझर्सच्या खात्यात 27.20 कोटी रुपये होते. त्यापैकी 20.50 कोटी रुपये त्यांनी फक्त पॅट कमिन्ससाठी मोजले.
WOAH 🤯🤯
Pat Cummins is SOLD to Sunrisers Hyderabad 🧡 for a whopping INR 20.5 Crore 🔥🔥
Congratulations to the @SunRisers 🙌#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, शाहबा अहमद. टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंग यादव, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू सनरायझर्स संघांने कायम ठेवले आहेत.