IPL 2024 Auction : 1 कोटीच्या रोवमॅन पॉवेलसाठी कोलकाता आणि राजस्थानमध्ये चुरस, गौतम गंभीरने कानात काहीतरी सांगितलं आणि…
आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सुरु असलेल्या लिलावात रॉवेन पॉवेलसाठी बोली लागली. यासाठी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरस निर्माण झाली. १ कोटी बेस प्राईस असलेल्या रोवमॅन पॉवेलची किंमत बघता बघता वाढत गेली. अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली..
मुंबई : आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव होत आहे. लिलावात पहिली बोली ही वेस्ट इंडिजच्या रॉवेन पॉवेलसाठी लागली. हा खेळाडू आपल्या चमूत घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. पहिलं नाव जसं रोवमॅन पॉवेल्स बाहेर आलं तसंच पहिला हात कोलकाता नाईट रायडर्सने वर केला. पण रॉवेनसाठी राजस्थान रॉयल्सनेही फिल्डिंग लावली होती. त्यामुळे बेस प्राईस 1 कोटी असूनही त्याची किंमत सहा पटीने वाढली. इतकी चुरस पहिल्याच खेळाडूसाठी पाहून इतरही आवाक् झाले. राजस्थान रॉयल्स कोलकात्याने बोली लावली की लगेचच दुसरी बोली लावण्यास सज्ज असायची. त्यामुळे कोलकात्याचे व्यवस्थापक वारंवार गौतम गंभीरचा सल्ला घेत होते. गौतम गंभीरने रॉवेन पॉवेलला आपल्या चमूत घेण्यासाठी बऱ्यापैकी फिल्डिंग लावली होती. पण राजस्थान रॉयल्स मागे जाण्याच्या पवित्रात नव्हती. त्यामुळे व्यवस्थापकांनी गौतम गंभीरसोबत एक चर्चा केली आणि कोलकात्याने आखुडता हात घेतला.
राजस्थान रॉयल्सने रोवमॅन पॉवेलसाठी ७.४० कोटी रुपये मोजले आणि आपल्या चमूत घेतलं. राजस्थानच्या खिशात १४.५० कोटी रुपये असताना फक्त एका खेळाडूसाठी ७.४० कोटी रुपये मोजले. अर्थात अर्ध्यापेक्षा जास्तीची किंमत मोजली. राजस्थानला एकूण ८ स्लॉट भरायचे आहेत. यात ३ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आता उरलेल्या रकमेत राजस्थान कसं आणि कोणते खेळाडू घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
SOLD! What a start 🙌
Base Price: INR 1 CroreFinal Price: INR 7.4 Crore 🔥🔥
Rovman Powell will play for @rajasthanroyals!#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
आयपीएलचं पहिलं पर्व राजस्थान रॉयल्सने जिंकलं होतं. मात्र त्यानंतर काही चांगली कामगिरी करता आली नाही. मागच्या १५ पर्वात राजस्थान रॉयल्स जेतेपदासाठी झुंजत आहे. आता रॉवेन पॉवेलला संघात घेतल्यावर ही उणीव भरून निघेल का? हे काही दिवसात स्पष्ट होईल. रॉवेन पॉवेल ३० वर्षांचा आहे. त्याने १७ आयपीएल सामन्यातील १५ डावात फलंदाजी करत २५७ धावा केल्या आहेत. ६७ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तसेच एक गडी बाद केला आहे
एडम झम्पा, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, परदीश कृष्णा, आर. अश्विन, रायन पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल या खेळाडूंना राजस्थान रॉयल्सने कायम ठेवले आहे.