CSK vs RCB सामन्यानंतर दिग्गजाने निवृत्तीबाबत अखेर निर्णय घेतलाच!
IPL 2024 Retirement : चेन्नई सुपर किंग्सने 17 व्या मोसमाच्या सलामीच्या सामन्यात विजयी सुरुवात केली. सीएसकेने आरसीबीचा धुव्वा उडवला. त्यानंतर दिग्ग्ज फलंदाजाने निवृत्तीबाबत अखेर सर्व काही सांगून टाकलं.
आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवला. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमध्ये (चेपॉक) करण्यात आलं होतं. आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीने आश्वासक सुरुवातीनंतर 5 विकेट्स गमावले. मात्र त्यानंतर अनुज रावत आणि अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 95 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यामुळे आरसीबीला सीएसकेसमोर 174 धावांचं आव्हान ठेवता आलं. सीएसकेने हे आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्यानंतर दिग्गज खेळाडूने निवृत्तीबाबत स्पष्ट संकेत दिले.
दिनेश कार्तिक याने आयपीएलच्या इतिहासात फलंदाज, माजी कर्णधार आणि विकेटकीपर अशा तिन्ही भूमिका यशस्वीपणे सार्थपणे पार पाडल्या आहेत. आरसीबीने 17 व्या हंगामात अनुज रावतसोबत 95 धावांची भागीदारी केली. तसेच 38 धावा करत जोरदार सुरुवात केली. कार्तिकने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत या हंगामानंतर निवृ्त्त होणार असल्याचे संकेत दिले. कार्तिक पहिल्या हंगापासून आयपीएलमध्ये खेळतोय. कार्तिकने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 6 संघांचं प्रतिनिधित्व केलंय. तसेच कोलकाता नाईट रायडर्ससाठी कॅप्टन्सीही केलीय.
तुझा हा चेपॉकवर अखेरचा सामना आहे का? असा प्रश्न कार्तिकला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कार्तिकने आशादायी उत्तर दिलं. ” हा चांगला प्रश्न आहे. मला आशा आहे की प्लेऑफमधील सामना खेळण्यासाठी मी येथे येईन. प्लेऑफसाठी आम्ही पात्र ठरलो आणि चेपॉकमध्ये खेळायला आलो तर तो माझा अखेरचा सामना असेल. मात्र जर असं झालं नाही, तर मी चेपॉकवर माझा अखेरचा सामना खेळलोय”, असं कार्तिक म्हणाला.
दरम्यान कार्तिक निवृत्त होणार असल्याची चर्चा 17 व्या हंगामाआधी रंगल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकला कॉमेंट्रीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे. कार्तिकने इंडिया-इंग्लंड कसोटी मालिकेतही कॉमेंट्री केली. मात्र आयपीएलसाठी त्याने कसोटी मालिकेतून समालोचक म्हणून माघार घेतली. आता कार्तिक पुन्हा चेपॉकवर खेळताना दिसणार की नाही? हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.