Video : रवींद्र जडेजा विचित्र पद्धतीने झाला बाद, धावताना केली मोठी चूक! तिसऱ्या पंचांनी पाठवलं तंबूत
आयपीएल 2024 स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात रवींद्र जडेजाला आपली चूक भोवली. प्लेऑफसाठीचा महत्त्वाचा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या रंगला. या सामन्यात धावसंख्या तशी खूपच कमी होती. पण ही धावसंख्या गाठताना चेन्नई सुपर किंग्सचा दम निघाला. 142 धावा करता धाकधूक वाढत होती.
आयपीएल स्पर्धेत तसं पाहीलं तर धावांचा डोंगर उभा राहतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. त्यामुळे 200 पार धावसंख्या केली तरी जिंकण्याची संधी कमीच असते. असं असताना 150 च्या आसपासची धावसंख्या म्हणजे सहज होणारी असते. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने जिंकण्यासाठी दिलेल्या 142 धावा सहज होणाऱ्या होत्या. मात्र या धावा करताना चेन्नई सुपर किंग्सचा दम निघाला. ऋतुराज गायकवाडने शेवटपर्यंत तग धरून राहिला आणि विजय मिळवून दिला. दुसरीकडे, ठराविक अंतराने पडत असलेल्या विकेट्समुळे धाकधूक वाढत होती. खेळपट्टीवर चेंडू हवा तसा बॅटवर येत नव्हता. त्यामुळे फटकेबाजी करताना फलंदाजांना अडचण येत होती. राजस्थान रॉयल्सच्या डावातही अशीच स्थिती होती. चेन्नईच्या डावातही फारसा काही बदल झाला नाही. विजय मिळवताना चेन्नईला चांगलाच संघर्ष करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सने 18.2 षटकात 5 गडी गमवून 142 धावा केल्या. या सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवून चेन्नईने प्लेऑफच्या रेसमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे, सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी रवींद्र जडेजाला आपली चूक भोवली. 26 चेंडूत 22 धावा हव्या असताना केलेल्या चुकीचा फटका बसला.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने 16वं षटक आवेश खानच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू फटकावला. तसेच एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेसाठी धावला. पण यावेळी ऋतुराज गायकवाड आणि त्याच्यात विसंवाद दिसला. त्यामुळे रवींद्र जडेजाला मध्यातूनच परतावं लागलं. मात्र यावेळी चेंडू संजू सॅमसनच्या हाती होती. ते रवींद्र जडेजाने बरोबर हेरलं होतं. त्यामुळे परतीच्या मार्गावर असताना स्टम्प अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेंडू त्याच्या पाठीवर आदळला. संजू सॅमसन आणि इतर खेळाडूंनी पंचांकडे दाद मागितली आणि निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. यावेळी रवींद्र जडेजाने चेंडू पाहून जाणीवपूर्वक तसं केल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याला बाद घोषित करण्यात आलं. रवींद्र जडेजा 7 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा ऑब्स्ट्रक्टिंग ऑफ द फिल्डचा शिकार ठरला.
Ravindra Jadeja given out obstructing the field. Jaddu was definitely not out acc to many cricket experts – Many are trending this with #Fixing pic.twitter.com/FOVIGIfZ7T
— ICT Fan (@Delphy06) May 12, 2024
रवींद्र जडेजा यापूर्वी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात असंच काहीसं केलं होतं. मात्र त्यावेळेस हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाण्यापूर्वीच पॅट कमिन्सने निर्णय मागे घेतला आणि जडेजाला जीवदान मिळालं. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाला जाणीवपूर्वक जीवदान दिल्याची चर्चाही रंगली होती. हा सामना सामना हैदराबादने 6 विकेट्सने जिंकला होता.
Obstructing or not? 🤔
Skipper Pat Cummins opts not to appeal 👏👏#SRHvCSK #IPLonJioCinema #TATAIPL pic.twitter.com/l85UXQEa4S
— JioCinema (@JioCinema) April 5, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल