IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स जेतेपदावर कोरणार नाव! अशी जुळून आली आकडेमोड
आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची विजयाची गाडी सुस्साट सुटली आहे. कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये स्थान पक्क करणारा पहिला संघ आहे. त्याचबरोबर टॉप 2 मधील स्थानही पक्कं झाला आहे. आता जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. असं असताना एक योगही जुळून आला आहे.
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 13 सामन्यापैकी 9 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला आहे. कोलकात्याचं प्लेऑफमधील स्थान या आधीच निश्चित झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा साखळी फेरीतील एक सामना शिल्लक आहे. मात्र 19 गुण झाल्याने कोलकात्याचं टॉप 2 मधील स्थान पक्कं झालं आहे. कारण राजस्थान रॉयल्सने उर्वरित दोन सामने जिंकले तरी 20 गुण होतील. राजस्थानचा संघ अव्वल स्थानी जाईल. पण कोलकात्याने पुढचा सामना गमावला तरी दुसऱ्या स्थानावर निश्चितपणे राहील. त्यामुळे कोलकात्याला प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतील. टॉपला असलेल्या दोन संघांना पराभवानंतर एलिमेनेटर संघासोबत पुन्हा खेळून फायनलला जाण्याची संधी असते.
कोलकाता नाईट रायडर्सचं टॉप दोन मधील स्थान निश्चित असल्याने 21 मे रोजी होणाऱ्या सामन्यात खेळेल. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस कोलकाता पहिले क्वॉलिफायर सामने खेळले आहे. या दोन्ही वेळेस जेतेपदावर नाव कोरण्यात कोलकाता नाईट रायडर्सला यश आलं आहे. 2012 आणि 2014 साली गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकात्याने पहिला क्वॉलिफायर म्हणून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर आहे.
दहा वर्षानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ पहिला क्वॉलिफायर सामना खेळण्यास सज्ज आहे. त्यामुळे कोलकात्याच्या चाहत्यांनी हे गणित जुळवून आणलं आहे. हे सर्व गणित पाहता आता कोलकाता नाईट रायडर्स जेतेपद जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरेल असा विश्वास कोलकात्याच्या चाहत्यांना आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघ: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, सुयश शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन, अल्लाह गझनफर.