LSG vs MI : मुंबईचे आटोकाट प्रयत्न, पण लखनऊच यशस्वी, 4 विकेट्सने विजय
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Highlights In Marathi : लखनऊला मुंबईवर विजय मिळवण्यासाठी जोरदार कसरत करावी लागली. लखनऊने रडत रडत विजय मिळवला
लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 48 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने लखनऊला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनऊने हे विजयी आव्हान 19.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लखनऊने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. लखनऊचा हा सहावा विजय ठरला आहे. तर मुंबईचा हा सातवा पराभव झाला आहे. लखनऊ विरुद्धच्या या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं समीकरण आता फार किचकट झालं आहे.
लखनऊकडून मार्कस स्टोयनिस याने 62 धावांची खेळी केली. स्टोयनिसने लखनऊसाठी सर्वाधिक धावा केल्या. तर कॅप्टन केएल राहुल याने 28 धावा जोडल्या. दीपक हुड्डाने 18 रन्स केल्या. एश्टन टर्नर याने 5 आणि आयुष बदोनीने 6 रन्स केल्या. तर निकोलस पूरन आणि कृणाल पंड्या या जोडीने लखनऊला विजयी केलं. निकोलसने नाबाद 14 धावा केल्या. तर कृणाल 1 रन करुन माघारी परतला. मुंबईकडून कॅप्टन हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर नुवान तुशारा, जेराल्ड कोएत्झी आणि मोहम्मद नबी या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
मुंबईची बॅटिंग आणि लखनऊची अप्रतिम बॉलिंग
त्याआधी लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनऊचा कॅप्टन केएल राहुल याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरवला. लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 झटके देऊन 144 धावांवर रोखलं. मुंबईकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. मुंबईकडून नेहल वढेरा याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. ईशान किशन याने 32 धावांचं योगदान दिलं. टीम डेव्हिड याने अखेरीस 18 बॉलमध्ये निर्णायक 35 धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने 10 रन्स केल्या. तर इतरांनी निराशा केली. लखनऊकडून मोहसिन खान याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. मार्कस स्टोयनिस, नवीन उल हक, मयंक यादव आणि रवी बिश्नोई या चौघांनी 1-1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान आणि मयंक यादव.