IPL 2024 : महेंद्रसिंह धोनीच्या नव्या भूमिकेचा उलगडा, अखेर सर्वकाही आलं समोर
आयपीएल 2024 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. महेंद्रसिंह धोनी 17 व्या सिझनसाठी सज्ज झाला आहे. असं असताना त्याने एक क्रिप्टिक मेसेज टाकला होता. नव्या भूमिकेबाबत सांगितलं होतं. त्या भूमिकेबाबत आता कुठे उलगडा झाला आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांचा जीवही भांड्यात पडला आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये थाला नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीचे कोट्यवधी चाहते आहेत. गेल्या 16 पर्वात महेंद्रसिंह धोनीने आपल्या खेळीने क्रीडारसिकांवर मोहिनी घातली आहे. आता 17 व्या पर्वासाठी महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तसेच यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने खळबळ उडवून दिली होती. ‘मी या आयपीएलची आतुरतेने वाट पाहात असून एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.’, असं महेंद्रसिंह धोनी याने सांगितलं होतं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? मेंटॉर होणार! अशा बऱ्याच चर्चा रंगल्या. आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण महेंद्रसिंह धोनीच्या नव्या भूमिकेचा उलगडा झाला. धोनीच्या क्रिप्टिक मेसेजचा खरा अर्थ आता लागला आहे. कारण एका जाहीरातीतून महेंद्रसिंह धोनीची नवी भूमिका समोर आली आहे.
महेंद्रसिंह धोनी जिओ सिनेमाच्या आयपीएल जाहिरातीत दिसला आहे. महेंद्रसिंह धोनीने या जाहिरातीचा व्हिडीओ त्याच्या फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने न्यू सिझन..डबल रोल…असं कॅप्शन दिलं आहे. धोनीची ती क्रिप्टिक पोस्ट या जाहिरातीबाबत होती. या जाहिरातीत धोनी दुहेरी भूमिकेत दिसला आहे. त्यामुळेच त्याने दुहेरी भूमिका असं लिहिलं होतं. धोनीची फेसबुक पोस्ट ही केवळ जाहिरातीसाठी होती हे आता स्पष्ट झालं आहे.
मागच्या पर्वाप्रमाणे यावेळी जिओ सिनेमा अॅपवर आयपीएल मोफत दिसणार आहे. जाहिरातीतून महेंद्रसिंह धोनीने आयपीएल विनामूल्य पाहता येईल हे स्पष्ट केलं आहे. आयपीएलचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त 21 सामन्यांची घोषणा झाली आहे. तर उर्वरित सामने लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यावर होईल. पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे.