Video : महेंद्रसिंह धोनी आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेला, व्हायरल व्हिडीओनंतर चाहत्यांचा संताप
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफच्या चौथ्या जागेसाठीची लढत एखाद्या चमत्कारासारखी घडली. स्पर्धेच्या मध्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण स्वप्नवत वाटत असलेली ही गोष्ट आज खरी ठरली आहे. आरसीबीने चेन्नईला नुसतं हरवलं नाही तर नेट रनरेटचं गणितही सोडवलं. पण या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीची एक गोष्ट बऱ्याच जणांना खटकली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 68व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला 27 धावांनी पराभूत केलं. खरं तर या सामन्यात 218 धावा केल्या असल्या तरी चेन्नईला 200 धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. आरसीबीने चेन्नईला 191 धावांवर रोखलं आणि प्लेऑफचं तिकीट 9 धावांनी मिळवलं. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. काल परवापर्यंत अशक्य वाटणारी गोष्ट आरसीबीच्या खेळाडूंनी शक्य करून दाखवली होती. सलग सहा सामने जिंकत आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं. मात्र या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीची एक कृती क्रीडाप्रेमींना चांगलीच खटकली. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आरसीबीच्या खेळाडूंना हस्तांदोलन केलं नाही आणि तसाच माघारी फिरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सामना संपल्यानंतर चेन्नईचे खेळाडू हस्तांदोलनासाठी रांगेत उभे होते. त्यात धोनी सर्वात पुढे उभा होता. तेव्हा खेळाडू आनंद साजरा करण्यात गुंग होते.
आरसीबीच्या खेळाडूंची वाट न पाहता महेंद्रसिंह धोनी पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी धोनीने आरसीबीच्या व्यवस्थापन स्टाफशी हस्तांदोलन केलं आणि ड्रेसिंग रुममध्ये परतला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आरसीबीच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पाचवेळा चषकावर नाव कोरल्यानंतरही अशी मानसिकता पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. थोडा वेळ वाट पाहिली असती तर काहीच वाया गेलं नसतं असंही काही जणांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे, जेव्हा चेन्नईचे खेळाडू आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करत होते. तेव्हा महेंद्रसिंह धोनी एकटात ड्रेसिंग रुममध्ये बसला होता. महेंद्रसिंह धोनीचा निराश चेहरा पाहून विराट कोहली त्याला तिथे भेटायला गेला आणि त्याने धोनीसोबत हस्तांदोलन केलं.
चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. पण यश दयालने शेवटच्या षटकात फक्त 7 धावा दिल्या. त्याने चेन्नई सुपर किंग्सला 20 षटकात 191 धावांवर रोखलं. या सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सला 27 धावांनी पराभूत केलं. आरसीबीचा प्लेऑफमधील सामना 22 मार्चला राजस्थान रॉयल्स किंवा सनरायझर्स हैदराबाद या पैकी एका संघाशी होणार आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अंतिम फेरी गाठतो का? आणि जेतेपदावर नाव कोरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.