IPL 2024, MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सचं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 258 धावांचं आव्हान
आयपीएल 2024 स्पर्धेतील 43वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने आक्रमक सुरुवात केली. तसेच 20 षटकात धावा केल्या.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 43 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सची पिसं काढली. मैदान छोटं असल्याचं कारण सांगत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी करायची असं सांगत मनासारखा निर्णय झाल्याचं बोलला. पहिल्या चेंडूपासून दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली. जेक फ्रेझर मॅकगुर्कने 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तसेच पॉवर प्लेममध्ये बिनबाद 92 धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पुरते हैराण असल्याचं दिसून आलं. कोठे चेंडू टाकावा हे देखील कळत नव्हतं. कारण फ्रेझर मॅकगुर्कची फटकेबाजी पाहून भल्याभल्यांना घाम फुटला होता. अखेर फ्रेझर मॅकगुर्कने 27 चेंडूत 84 धावा केल्या आणि पियुष चावलाच्या गोलंदाजीवर बाद झाला. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. अभिषेक पोरेलने 36 धावांची खेळी केली. त्यानंतर शाई होप आणि ऋषभ पंतने धाव पुढे नेला. दोघांनी 22 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 257 धावा केल्या आणि विजयासाठी 258 धावांचं आव्हान दिलं.
ट्रिस्टन स्टब्स आणि ऋषभ पंतने त्यानंतर गोलंदाजांना धारेवर धरलं. या दोघांनी धावांचा डोंगर रचला. 18 व्या षटकात ट्रिस्टन स्टब्सने ल्यूक वूडला फोड फोड फोडला. एका षटकात 5 चौकार आणि एक षटकार मारला. एकाच षटकात 26 धावा आल्या. ऋषभ पंतचा डाव 19 चेंडूत 29 धावा करून आटोपला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने झेल पकडला. जेक फ्रेझर-मॅकगुर्कने 27 चेंडूत 84, अभिषेक पोरेलने 27 चेंडूत 36, शाई होपने 17 चेंडूत 41, ऋषभ पंतने 19 चेंडूत 29 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स 25 चेंडूत 48 धावा करत नाबाद राहिला. अक्षर पटेलने 6 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून ल्यूक वूड, जसप्रीत बुमराह, पियुष चावला आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.