IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, दिल्लीवर 29 धावांनी मात
IPL 2024 MI vs DC Match Result : मुंबईची अखेर विजयाची प्रतिक्षा संपवी आहे. मुंबईने दिल्लीवर 29 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईचा हा या हंगामातील पहिला विजय ठरला आहे.
मुंबई इंडियन्सने सलग 3 पराभवानंतर अखेर आयपीएलच्या 17 व्या मोसमात विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईने दिल्लीवर 29 धावांनी मात केली आहे. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीनेही चांगली झुंज देत अखेरपर्यंत प्रतिकार केला. मात्र डोंगराएवढ्या धावांपुढे दिल्ली अपयशी ठरली. दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावा करता आल्या. दिल्लीचा हा चौथा पराभव ठरला.
मुंबईने दिलेल्या 235 धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून ट्रिस्टन स्ट्रब्स याने 25 बॉलमध्ये 7 सिक्स आणि फोरसह सर्वाधिक नाबाद 71 धावांची खेळी केली. मात्र त्याला दिल्लीला विजयापर्यंत पोहचता आलं नाही. ट्रिस्टन व्यतिरिक्त दिल्लीकडून पृथ्वी शॉ याने 40 बॉलमध्ये 66 धावांचं योगदान दिलं. पृथ्वीने या खेळीत 3 सिक्स आणि 8 फोर ठोकले. अभिषेक पोरेल याने 31 बॉलमध्ये 41 धावा केल्या. मात्र इतरांना विशेष काही करता आलं नाही.
दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर याने 10, कॅप्टन ऋषभ पंत 1, अक्षर पटेल 8, ललित यादव 3 आणि झाय रिचर्डसन याने 2 धावा केल्या. तर कुमार कुशाग्रा याला भोपळाही फोडता आला नाही. तर मुंबई इंडियन्सकडून गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रोमरियो शेफर्ड याने 1 विकेट घेतली.
मुंबईची बॅटिंग
त्याआधी रोमरियो शेफर्ड याने 20 व्या ओव्हरमध्ये 2 फोर आणि 4 सिक्ससह 32 धावा ठोकल्याने मुंबईने 20 ओव्हरमध्ये 234 धावा केल्या. रोमरियोने 10 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद 39 धावा केल्या. टीम डेव्हीड याने 45 धावांची नाबाद खेळी केली. त्याआधी सलाम जोडी रोहित शर्मा आणि ईशान किशन या दोघांनी अनुक्रमे 49 आणि 42 धावा जोडल्या. कॅप्टन हार्दिक पंड्या याने 39 धावांचं योगदान दिलं. तर तिलक वर्मा 6 धावा करुन आऊट झाला. तर सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडता आला नाही. दिल्लीकडून एनरिच नॉर्तजे आणि अक्षर पटेल दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर खलील अहमदला 1 विकेट मिळाली.
मुंबईचा विजयी क्षण
𝘚𝘰𝘢𝘬 𝘪𝘵 𝘪𝘯 𝘣𝘰𝘺𝘴, 𝘴𝘰𝘢𝘬 𝘪𝘵 𝘪𝘯 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvDC #ESADay #EducationAndSportsForAllpic.twitter.com/cnfccQ45U3
— Mumbai Indians (@mipaltan) April 7, 2024
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.