IPL 2024, MI vs KKR : कोलकात्याविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठी जर तरची लढाई, या खेळाडूंवर असेल सर्वकाही
आयपीएल 2024 स्पर्धेतील 51वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र गणिती भाषेत अजूनही आशा जिवंत आहे. कोलकाता मुंबई सामन्यात या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.
आयपीएल स्पर्धेतील 51वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका पुन्हा एकदा सुरु झाली आहे. लखनौ सुपर जायंट्सनेही मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं. तर कोलकाता नाईट रायडर्सने पुन्हा एकदा विजयी ट्रॅक पकडला आहे. पंजाबकडून पराभव झाल्यानंतर दिल्लीला पराभूत केलं आणि गुणतालिकेत दुसरं स्थान अबाधित ठेवलं. एकीकडे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफमधलं स्थान डळमळीत झालं आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफच्या दिशेने कूच केली आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आतापर्यंत 32वेळा आमनेसामने आले आहेत. यात 23 वेळा मुंबई इंडियन्सने, तर 9 वेळा कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला आहे.
दोन्ही संघांच्या काही खेळाडूंकडे सामना फिरवण्याची ताकद आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे 5 आणि मुंबई इंडियन्सच्या 6 खेळाडूंचा समावेश आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरीन, फिल सॉल्ट, आंद्रे रस्सेल, वरुण चक्रवर्थी आणि वैभव अरोरा यांचा समावेश आहे. तर मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि पियुष चावला यांचा समावेश आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममधली खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी आहे. मैदान छोटं असल्याने चौकार आणि षटकारांची बरसात होईल यात शंका नाही. पॉवर प्लेमध्ये वेगवान गोलंदाजांना काही अंशी मदत होऊ शकते. फिरकीपटूंना या खेळपट्टीवर फारशी मदत मिळणार नाही. नाणेफेकीचा कौल महत्त्वाची भूमिका बजावेल. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार प्रथम गोलंदाजीला पसंती देतील आणि दुसऱ्या डावात आव्हान गाठतील.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह.
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, वेंकटेश अय्यर, आंद्रे रस्सेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हार्षित राणा, वरुण चक्रवर्ती.