IPL 2024 | रहाणेचा भिडू मुंबई इंडियन्समध्ये, कॅप्टन हार्दिक प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देणार?
Shams Mulani Mumbai Indians Ipl 2024 | यंदा मुंबई इंडियन्स टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने आपला कॅप्टन बदलला आहे. रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्या कॅप्टन असणार आहे. हार्दिक आपल्या नेतृत्वात मुंबईचा ऑलराउंडर शम्सल मुलानी याला संधी देणार का?
मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण 10 संघाचे खेळाडू एक एक करुण जोडले जात आहेत. यंदाच्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. तर मुंबई इंडियन्स 24 मार्च रोजी यंदाच्या मोसमातील पहिला सामना हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. हार्दिकला रोहितकडे असलेली नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे आता हार्दिक पलटणसाठी कशी कामगिरी करतो, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. तसेच हार्दिक टीममध्ये असलेल्या ज्युनियर युवराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शम्स मुलानी याला पदार्पणाची संधी देणार का? याकडेही क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
शम्स मुलानी याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने नुकतंच विदर्भाला पराभूत करत 8 वर्षांची प्रतिक्षा संपवली आणि रणजी ट्रॉफी जिंकली. मुंबईची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही 42 वी वेळ ठरली. मुंबईच्या या विजयात अनेक खेळाडूंनी निर्णायक भूमिका बजावली. त्यापैकी एक म्हणजे मुंबईकर ऑलराउंडर शम्स मुलानी. शम्स मुलानीने मुंबईसाठी बॅटिंग आणि बॉलिंगसह अष्टपैलू कामिगरी केली. शम्सने 2023-2024 रणजी ट्रॉफी स्पर्धेत 35 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर 353 धावाही केल्या. शम्स याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे शम्सला कॅप्टन हार्दिक आयपीएल डेब्यूची संधी देणार का, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे.
शम्स मुलानी याची क्रिकेट कारकीर्द
शम्स मुलानी याने 38 फर्स्ट क्लास, 55 लिस्ट ए आणि 43 टी 20 सामने खेळले आहेत. शम्सने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 1654, 632 आणि 186 धावा केल्या आहेत. तसेच 180, 82 आणि 52 अशा विकेट्सही घेतल्या आहेत. शम्सच्या आकड्यावरुन तो किती प्रतिभावान आहे, हे स्पष्ट होतं. आता हार्दिक शम्सच्या या अनुभवाचा किती उपयोग करुन घेतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
दरम्यान बीसीसीआयने लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार एकूण 17 दिवसांमध्ये 22 सामने पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स पहिल्या टप्प्यात आपले एकूण 4 सामने खेळणार आहे.
मुंबईंच्या सामन्यांचं वेळापत्रक
विरुद्ध गुजरात टायटन्स, 24 मार्च, अहमदाबाद.
विरुद्ध सनरायजर्स हैजराबाद, 27 मार्च, हैदराबाद.
विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई.
विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स, 7 एप्रिल, मुंबई.