IPL 2024: रोहित शर्माचा मुंबईच्या शेवटच्या सामन्यानंतर जाहीर संताप, ट्विट करत म्हणाला…
Rohit Sharma Angry : मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. रोहितने कुणावर संताप व्यक्त केला? जाणून घ्या.
मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमात हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीत निराशाजनक कामगिरी राहिली. मुंबईचा साखळी फेरीतील अखेरचा सामना हा 17 मे रोजी घरच्या वानखेडे स्टेडियममध्ये पार पडला. मुंबईला अखेरच्या सामन्यातही विजय मिळवता आला नाही. मुंबईला लखनऊकडून पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा हा या हंगामातील 14 सामन्यांमधील 10 वा पराभव ठरला. मुंबईचं आव्हान या पराभवासह पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी संपलं. मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याने ट्विट केलंय. रोहितने ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्ट्सबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. रोहितने ट्विटमध्ये काय म्हटलंय, जाणून घेऊयात.
लखनऊ विरुद्धच्या सामन्याआधी रोहित शर्मा आपले मित्र आणि माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी यांच्यासह बाउंड्री लाईनवर गप्पा मारत होता. यावेळेस रोहितचा मित्रांसोबतचा गप्पा मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपला व्हीडिओ शूट होत असल्याचं पाहून रोहितने “ऑडिओ रेकॉर्ड करु नको, आधीच एका व्हीडिओने वाट लावली आहे”, असं म्हटलं. मात्र त्यानंतरही रोहितचं बोलणं शूट केलं गेलं. त्यानंतर हा व्हीडिओ हा व्हायरल झाला. त्यावरुन रोहितने आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
रोहितने ट्विटमध्ये काय म्हटलं?
क्रिकेटपटूंच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला जात आहे. आमच्या प्रत्येक हालचाली आणि संभाषण शूट केल्या जात आहेत. आम्ही आमच्या मित्रांसह, सहकाऱ्यांसह सरावादरम्यान तसेच सामन्याच्या दिवशी बोलत असताना प्रत्येक क्षण हा शूट केला जात आहे. मी स्टार स्पोर्ट्सला शूट न करण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही हा व्हीडिओ ऑन एअर दाखवण्यात आला. हा आमच्या गोपनियतेचा भंग आहे. एक्सक्ल्युझिव्ह कंटेंट आणि एंगजमेंटमुळे एक दिवस क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वासाला तडा जाईल”, असं रोहितने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.
रोहित शर्माचा ट्विटद्वारे संताप
The lives of cricketers have become so intrusive that cameras are now recording every step and conversation we are having in privacy with our friends and colleagues, at training or on match days.
Despite asking Star Sports to not record my conversation, it was and was also then…
— Rohit Sharma (@ImRo45) May 19, 2024
संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी मुंबई-कोलकाता सामन्यावेळेस अभिषेक नायर आणि रोहित शर्मा या दोघांच्या संवादाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओतील संभाषणामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. रोहितने या व्हीडिओनंतर चांगलीच धास्ती घेतली. लखनऊ विरुद्धच्या सामन्याआधी वानखेडे स्टेडियममध्ये रोहित क्रिकेटर धवल कुलकर्णी आणि इतर मित्रांसह गप्पा मारत होता. आपलं बोलणं शूट होत असल्याचं समजताच रोहितने कॅमेऱ्याकडे हात जोडून म्हटलं की “भावा ऑडिओ बंद कर. एका ऑडिओने माझी वाट लावली आहे”. मात्र या विनंतीनंतरही त्याचा हा व्हीडिओ शूट झाला. त्यामुळे रोहितने संताप व्यक्त केलाय.