IPL 2024 : पंजाब विरुद्ध आरसीबी भिडणार, मुंबईनंतर कुणाचं पॅकअप होणार?
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru : पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी अखेरची संधी आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सवर 10 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयानंतर मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं. आता 58 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी ही अखेरची संधी असणार आहे, कारण जो संघ पराभूत होईल, त्याचं या मोसमातून आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना असणार आहे.
आरसीबी आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांची स्थिती आणि कामगिरी सारखीच आहे. दोन्ही संघांनी 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. तर 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी आणि पंजाब दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 8-8 गुण आहेत. उर्वरित 3 सामने जिंकले तरी 14 पॉइंट्स होतील. त्यामुळे या दोघांपैकी एका संघाचं आज साखळी फेरीतूनच बाहेर होणं निश्चित आहे.
मुंबईनंतर दुसरी टीम कोणती?
आरसीबीने या हंगामात पराभवाने सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पहिला विजय मिळवला. त्यानंतर आरसीबीला तब्बल 1 महिन्याने आणि 6 पराभवानंतर पहिला विजय मिळवला. आरसीबीने सलग 3 विजये मिळवले आहेत. त्यामुळे आरसीबी विजयी चौकार मारुन आव्हान कायम राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबने विजयी सुरुवात केली. त्यानंतर 2 सामने गमावले आणि मग विजय मिळवला. पंजाबने त्यानंतर सलग 4 वेळा पराभव स्वीकारला. मग सलग दोनदा विजय मिळवला. त्यानंतर अखेरचा सामन्यात पराभव झाला.
पंजाब-आरसीबी दुसऱ्यांदा आमनेसामने
दरम्यान पंजाब-आरसीबी उभयसंघ या हंगामात दुसऱ्यांदा भिडणार आहेत. याआधी उभयसंघात 25 मार्च रोजी सामना झाला होता. तेव्हा आरसीबीने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे आता पंजाबचा प्रयत्न या सामन्यात पराभवाचा वचपा घेण्यासह प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्याचा असणार आहे. आता यात कोण यशस्वी ठरतं आणि कुणाचं पॅकअप होतं, हे काही तासात स्पष्ट होईल.
पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.
आरसीबी टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपली, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरून , मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत