IPL 2024 : सलग तीन सामन्यात पराभव होऊनही राजस्थान प्लेऑफसाठी क्वॉलिफाय, वाचा नेमकं काय घडलं
आयपीएल 2024 स्पर्धेच्या 65व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने येत आहेत. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने थेट प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता जर तरच्या गणितातून राजस्थानची सुटका झाली आहे. त्यामुळे दोन सामन्यासाठी लढत होणार आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत अगदी शेवटच्या टप्प्यात प्लेऑफसाठीची चुरस पाहायला मिळत आहे. कोणता संघ क्वॉलिफाय करणार आणि कोणता नाही याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांमध्ये उर्वरित दोन सामने न खेळताच राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. प्लेऑफमध्ये 19 गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स एन्ट्री मारणारा पहिला संघ ठरला. मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्याच्या निकालाचा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या नावापुढे आता Q हे अक्षर लागलं आहे. अर्थात राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. आता उर्वरित दोन स्थानासाठी जबरदस्त चुरस आहे. कारण राजस्थान रॉयल्सने उर्वरित दोन सामने गमावले तरी अव्वल 4 मधील स्थान पक्कं असणार आहे. कारण राजस्थान रॉयल्स संघाने आधीच 16 गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांनाच 16 गुण कमवण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांनी 16 कमवले तरी राजस्थान टॉप 4 मध्ये राहील.
राजस्थान रॉयल्सने उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर टॉप 2 मधील स्थान पक्क होईल. त्यामुळे प्लेऑफमध्ये खेळण्याची दोनदा संधी मिळेल. कारण टॉप 2 संघामध्ये पहिला सामना आणि तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये दुसरा सामना होतो. टॉप2 मधील पराभूत संघासोबत तिसऱ्या-चौथ्या संघाच्या विजेत्या संघाला खेळावं लागतं. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल. राजस्थान रॉयल्सचा पुढचे सामने हे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससोबत आहेत. 15 मे रोजी पंजाब आणि 19 मे रोजी कोलकात्याशी लढत असेल.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु उर्वरित दोन स्थानांसाठी स्पर्धा करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना जिंकला तर थेट तिसरं किंवा चौथं स्थान मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे हा सामना खूपच रंगतदार होणार आहे. आरसीबीला या सामन्यात 18.1 षटकात दिलेलं टार्गेट पूर्ण करावं लागेल किंवा चेन्नई सुपर किंग्सला 18 धावांनी पराभूत करावं लागणार आहे.