IPL 2024 : आरसीबीचं असं जुळून आलं 18 अंकांचं गणित, हा योगायोग पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. आता काही सामने शिल्लक असून यावरून प्लेऑफचं चित्र स्पष्ट होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सचं भवितव्य 18 मे रोजी स्पष्ट होणार आहे. असं असताना एक योग जुळून आला आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील 68वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 18 मे रोजी हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. प्लेऑफमधील सर्व गणित या सामन्यावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे चाहते मात्र आकडेमोड करण्यास मग्न झाले आहेत. यापूर्वी दोन्ही संघ 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सने 21वेळा, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 10 वेळा सामना जिंकला आहे. तर एक सामना काही कारणास्तव रद्द झाला. या 32 पैकी 2 सामने हे 18 मे रोजी झाले होते. योगायोग म्हणजे हे दोन्ही सामने आरसीबीने जिंकले आहेत. विशेष म्हणजे 18 मे रोजी एकूण चार सामने यापूर्वी झाले आहेत. चारही सामन्यावर आरसीबीने विजयाची मोहोर उमटवली आहे. 18 मे 2013 रोजी चेन्नई सुपर किंग्सला, 18 मे 2014 रोजी चेन्नई सुपर किंग्सला, 18 मे 2016 रोजी पंजाब किंग्सला, 18 मे 2023 रोजी हैदराबादला पराभूत केलं आहे. त्यामुळे 18 मे रोजी होणारा सामना आरसीबी जिंकेल असं चाहत्यांना वाटत आहे.
18 मे रोजी विराट कोहलीने जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं होतं. विराट कोहली 18 मे या तारखेला आयपीएलचे 4 सामने खेळला आहे. यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 29 चेंडूत नाबाद 56, 27 चेंडूत 29 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्सविरुद्ध 50 चेंडूत 113 आणि मागच्या पर्वात हैदराबाद विरुद्ध 63 चेंडूत 100 धावा केल्या आहेत. त्यामुळे यंदाही विराट कोहली या तारखेवर मोठी कामगिरी करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
दुसरीकडे 18 धावांचा एक वेगळाच योग जुळून आला आहे. आरसीबीने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना 18 धावांनी जिंकला तर नेट रनरेटने पुढे जाईल. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं आव्हा 18.1 षटकात पूर्ण केलं तर नेट रनरेट चांगला राहील. त्यामुळे 18 मे रोजी होणाऱ्या सामन्यात 18चं गणित जुळून आलं आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये महिला संघाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. कर्णधार स्मृती मंधाना आणि विराट कोहलीचा जर्सीचा नंबरही सारखाच आहे. दोघंही फ्रेंचायसाठी सलामीला फलंदाजीला उतरतात. अशी सर्व आकडेमोड पाहता अंकशास्त्र मानणाऱ्या चाहत्यांना या दिवशी आरसीबी जिंकेल असा विश्वास वाटत आहे. आता या दिवशी आरसीबीचा संघ नेमकी कशी कामगिरी करतो याची उत्सुकता वाढली आहे. प्लेऑफमध्ये आरसीबीला स्थान मिळते की नाही त्याच दिवशी स्पष्ट होईल.