RCB vs CSK : आरसीबीने पराभूत केल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने काढलं मागचं पुढचं सर्वकाही, म्हणाला..
आयपीएल 2024 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं स्वप्न अवघ्या 9 धावांनी हुकलं. पाऊसही चेन्नई सुपर किंग्सच्या मदतीला उतरला नाही. त्यामुळे यंदा ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात प्लेऑफ गाठणं झालं नाही. या सामन्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड याने पराभवाचं विश्लेषण केलं आणि नेमकं काय चुकलं ते सांगितलं.
आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या स्वप्नावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पाणी फेरलं. नाणेफेकीचा कौल कधी नव्हे तो ऋतुराज गायकवाडच्या बाजूने लागला होता. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरसीबीने दिलेलं टार्गेट चेन्नई सहज गाठेल असं वाटत होतं. पण आरसीबीने इथपर्यंत मारलेली मजल काही सोपी नव्हती. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी काहीही करण्याची खेळाडूंची तयारी वागण्यातून दिसत होती. सामूहिक कामगिरी करत आरसीबीने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजलं. रजत पाटीदारनेही फॉर्मात येत जबरदस्त कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेल कधी नव्हे तो या सामन्यात चमकला. त्यामुळे एकंदरीत आरसीबीची कामगिरी पाहता चेन्नई सुपर किंग्सचं काहीही चाललं नाही. चतूर चालाख विकेटकीपर धोनीही या रणनितीपुढे फेल ठरला. आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे प्रत्येकी 14 गुण आहेत.मात्र नेट रनरेटमध्ये आरसीबी चेन्नई सुपर किंग्सपेक्षा वरचढ ठरली. या सामन्यातील पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मन मोकळं केलं.
“खरे सांगायचे तर मला ही चांगली विकेट होती असं वाटते. विकेट फिरकी आणि थोडी पकड घेणारी होती. त्यामुळे या मैदानावर 200 धावा सहज करता येण्यासारख्या होत्या. पण आम्ही नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिलो.सामन्यात एक किंवा दोन हिटची बाब होती, कधीकधी टी20 सामन्यात असे होऊ शकते. सीझनचा सारांश सांगायचे तर, 14 गेमपैकी सात विजय मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. शेवटच्या दोन चेंडूत धावा ओलांडू शकलो नाही. आमच्या संघात ज्या प्रकारच्या दुखापती झाल्या होत्या त्याचा फटका बसला. दोन आघाडीच्या गोलंदाजांची उणीव, कॉनवे देखील क्रमवारीत वरच्या स्थानावर नव्हता. मला वाटते की तीन प्रमुख खेळाडूंना मुकल्याने खूप फरक पडला.”, असं ऋतुराज गायकवाड याने सामन्यानंतर सांगितलं.
“गेल्या वर्षी आमच्या शेवटच्या नॉकआऊट सामन्यात आम्हाला शेवटच्या 2 चेंडूंत 10 धावा मिळाल्या. त्यामुळे ही परिस्थिती अशीच होती, तरीही गोष्टी आमच्या वाट्याला आल्या नाहीत. माझ्यासाठी, वैयक्तिक टप्पे फारसे महत्त्वाचे नाहीत, शेवटी विजय हेच ध्येय आहे. जर तुम्ही तिथे पोहोचत नसाल तर ही निराशा आहे. तुम्ही एका मोसमात 100 धावा किंवा 500-600 धावा केल्या तरी काही फरक पडत नाही. पराभवाने मी निराश आहे “, असंही ऋतुराज गायकवाड पुढे म्हणाला.