IPL 2024, RCB vs CSK : बंगळुरुची प्लेऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री, आरसीबी भल्याभल्यांना पुरून उरली
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. सुरुवातीला एका पाठोपाठ सलग सामने गमवल्यानंतर प्लेऑफमध्ये एन्ट्री मारेल असं वाटलं नव्हतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला धावांनी पराभूत प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील रंगतदार सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नई सुपर किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 5 गडी गमवून 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला काहीही करून 200 धावांवर रोखायचं होतं. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाज आणि खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावलं होतं. कारण याच सामन्यात जे काही सर्वोत्तम द्यायचं ते द्यायचं होतं. चेन्नई सुपर किंग्सला 191 धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने साखळी फेरीतील 14 सामन्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. सलग सहा सामन्यात विजय मिळवून आरसीबीने ही कामगिरी केली आहे. आरसीबीने 14 गुण आणि +0.459 नेट रनरेटसह गुणतालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे. आता बंगळुरुचा प्लेऑफमध्ये सामना राजस्थान रॉयल्स की सनरायझर्स हैदराबादशी होणार हे रविवारी होणाऱ्या सामन्यानंतर कळेल.
ग्लेन मॅक्सवेलनी या सामन्यात काही अंशी चमकला. फलंदाजीत पाच चेंडू खेळत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. तसेच पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडची विकेट काढली. त्यानंतर डेरिल मिचेलला यश दयालने तंबूत पाठवलं. तिसऱ्या गड्यासाठी रचिन रविंद्र आणि अजिंक्य रहाणेनं 66 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अजिंक्य रहाणे बाद झाला आणि चेन्नई सुपर किंग्स पुन्हा अडचणीत आली. रचिन रविंद्र 61 धावांवर असताना धावचीत झाला आणि सर्वच चित्र बदललं. शिवम दुबेही काही खास करू शकलानाही. 7 धावा करून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
मिचेल सँटनरला मोहम्मद सिराजने तंबूत पाठवलं. 3 धावांवर असताना फाफ डु प्लेसिसने त्याचा जबरदस्त झेल घेतला. रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याकडून अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाही. धावा आणि चेंडू यातलं अंतर वाढत गेलं. यश दयालने शेवटचं षटक जबरदस्त टाकलं. मागच्या पर्वात त्याला पाच षटकार पडल्याने हिणवलं गेलं होतं. त्याच यश दयालने आरसीबीला प्लेऑफचा रस्ता दाखवला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.