IPL 2024, RCB vs CSK : आरसीबी चेन्नई या महत्त्वाच्या सामन्यात पाच खेळाडूंची दांडी! दोन्ही बाजूने टेन्शन वाढलं
आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफची लढत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. क्रीडाप्रेमींचं लक्ष चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याकडे लागून आहे. कारण या सामन्यातून एका संघाचं प्लेऑफचं गणित सुटणार आहे. असं असताना महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाच खेळाडू गैरहजर असण्याची शक्यता आहे.
आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सचं पारडं जड दिसून आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 10 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर एक सामना निकालाविना सुटला आहे. आता आयपीएल 2024 स्पर्धेतील 68वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. 18 मे रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची धाकधूक वाढली आहे. कारण या सामन्यात दोन्ही संघातील एकूण 5 खेळाडू नसतील. पाचपैकी तीन खेळाडू चेन्नई सुपर किंग्स आणि दोन खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे असतील. त्यामुळे प्लेइंग 11 आणि इम्पॅक्ट प्लेयर्स गणित बसवणं कठीण होणार आहे. फॉर्मात असलेल्या खेळाडूंऐवजी बेंचवर असलेल्या खेळाडूंवर विश्वास टाकताना बराच विचार करावा लागेल.
चेन्नई सुपर किंग्सकडून मोईन अली, मुस्तफिझुर रहमान आणि मथिशा पथिराना हे खेळाडू नसतील. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून रीस टोपली आणि विल जॅक्स संघात नसतील. इंग्लंड पाकिस्तान यांच्यात 21 मे पासून टी20 मालिका सुरु होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेपूर्वी खेळाडूंना एकत्र येण्यास सांगितलं आहे. त्यामुळे हे खेळाडू साथ सोडणार आहेत. मोईन अली चेन्नई सुपर किंग्स संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावतो. त्यामुळे त्याची जागा भरून काढणं कठीण जाईल.
बांगलादेशचा डावखुरा वेगवागन गोलंदाज मुस्तफिझुर रहमान आधीच चेन्नई सुपर किंग्स सोडून गेला आहे. बांगलादेश संघ 21 मे पासून यूएसए विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या पुढील सामन्यांसाठी मुस्तफिझुर देखील अनुपलब्ध आहे. श्रीलंकेचा संघ टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेला गेला आहे. मथिशा पथिराना देखील या संघात आहे. त्यामुळे पुढील सामन्यांसाठी पथिराना देखील नसेल.
आरसीबी संघाचा स्फोटक स्ट्रायकर विल जॅक्स आधीच इंग्लंडला रवाना झाला आहे. जॅक्सने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघ सोडला आहे. तो इंग्लंडच्या टी20 संघाचा भाग होता.आरसीबी संघात असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीही मायदेशी परतला आहे. 21 मेपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टोपली मायदेशी परतला आहे.