IPL 2024, RCB vs RR : आरसीबीच्या पराभवानंतर फाफ डु प्लेसिस इम्पॅक्ट प्लेयरवर संतापला, सामन्यानंतर सुनावली खरीखोटी
आयपीएल 2024 स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जेतेपदाची झोळी रितीच राहिली. खरं तर साखळी फेरीतील संघाची कामगिरी पाहून प्लेऑफमध्ये येईल याची शाश्वती नव्हती. सहा सामन्यात करो या मरोची लढाई लढत आरसीबीने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली होती. पण राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून पराभूत केलं. यामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कामगिरी वाखण्याजोगे होती. स्पर्धेच्या सुरुवातीला निराशाजनक कामगिरी करूनही जबरदस्त कमबॅक केलं. तसेच प्लेऑफमध्ये स्थान मिळवल्याने जेतेपदाच्या आशा वाढल्या होत्या. 17व्या पर्वात तरी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल अशी आशा होती. मात्र तसं काही होऊ शकलं नाही. एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. त्यामुळे आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. आरसीबीला आणखी एका पर्वात जेतेपदाची वाट पाहावी लागणार आहे. एलिमिनेटर सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर वाटेला फलंदाजी आली होती. आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 19 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस याने विश्लेषण केलं. तसेच इम्पॅक्ट प्लेयरमुळे कशी वाट लागली हे देखील अधोरेखित केलं आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर फाफनेही त्याच मुद्द्यावर पराभवानंतर बोट ठेवलं.
“दव पडलं होतं त्यामुळे गोलंदाजी करणं कठीण झालं. त्यामुळे कुठेतरी धावा कमी पडल्या असंच म्हणावं लागेल. आणखी 20 धावा असत्या तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण अतितटीच्या लढतीचं सर्व श्रेय संघ सहकाऱ्यांना जातं.”, असं फाफ डु प्लेसिसने सामन्यानंतर सांगितलं. “जर तुम्हाला खरं सांगायचं खेळपट्टी आणि परिस्थितीचा अंदाज घेतला तर इथे 180 धावा खूप होत्या. कारण बॉल स्विंग होत होता आणि स्लो देखील येत होता. पण आम्ही एक बाब संपूर्ण पर्वात पाहिली ती म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर..त्यामुळे इथे कट टू कट स्कोअर जिंकण्यासाठी ठरू शकत नाही. त्यात दव पडतं.”, फाफने असं सांगत इम्पॅक्ट प्लेयरवर बोट ठेवलं.
“साखळी फेरीच्या 1 ते 9 सामन्यात आम्ही कुठेच नव्हतो. पण मागच्या सहा सामन्यात कमबॅक केलं. मला याचा अभिमान वाटतो. पण आज आम्ही 20 धावांनी कमी पडलो असं वाटते. आम्ही अधिक 20 धावा केल्या असत्या तर आज चित्र वेगळं असतं.”, असंही फाफने पुढे सांगितलं. शिमरोन हेटमायर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरला होता. त्याने 14 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या.