मोठी बातमी! आरसीबीचा सामन्यापूर्वीचा सराव रद्द, चार जणांना अटक; काय घडलं जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढाई आहे. मात्र या सामन्यापूर्वी आरसीबीच्या खेळाडूंना सराव करता आला नाही. विराट कोहलीच्या सुरक्षेच्या कारणास्तव आरसीबीने सराव रद्द केला. नेमकं काय घडलं ते समजून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्याची कोट्यवधी क्रीडाप्रेमींना आस लागून आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ सामन्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. असं असताना विराट कोहलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आरसीबीला चिंता लागून आहे. विराट कोहलीची सुरक्षेचा प्रश्न पाहता आरसीबीने एलिमिनेटर सामन्यापूर्वीचा सराव रद्द केला आहे. तसेच पत्रकार परिषद घेतली नाही. महत्त्वाच्या सामन्यापूर्वी फ्रेंचायसीच्या या निर्णयामुळे आरसीबीच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आरसीबीने साखळी फेरीतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शनिवारी खेळला. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी संघाने विश्रांती घेतली. आता अहमदाबादला पोहोचल्यानंतर आरसीबीने सराव सत्र रद्द केले.
बंगाली दैनिक आनंदबाजार वृत्तपत्राच्या बातमीनुसार, गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे विराट कोहलीच्या सुरक्षेमुळे आरसीबीने आपला सराव सामना रद्द केला आहे. त्यामुळे कोणत्याही संघाने पत्रकार परिषद घेतली नाही. एलिमिनेर सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळावरून गुजरात पोलिसांनी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून चार जणांना सोमवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, संशयास्पद व्हिडीओ आणि काही मेसेज जप्त केले आहेत. या बातमीमुळे आरसीबी फ्रेंचायसी तणावाखाली असल्याचं बोललं जात आहे.
विराट कोहलीच्या सुरक्षेच्या कारणास्तव आरसीबीने सराव रद्द केला. पण दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघाने मैदानावर चांगलाच घाम गाळला. सराव का रद्द केला याबाबत आरसीबीकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. दुसरीकडे, गुजरात क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी सुरक्षेचं कारणास्तव सराव रद्द केल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
“कोणत्याही हल्ल्याची धमकी नाही. आम्ही या दोन्ही संघाच्या सरावासाठी गुजरात कॉलेज ग्राउंट दिलं होतं. आरसीबी 2 ते 5 दरम्यान सराव करणार होती. त्यानंतर ही वेळ 3 ते 6 करण्यात आली. कारण 6.30 पर्यंत बऱ्यापैकी उजेड असतो.पण उष्णतेच्या लाटेमुळे आरसीबीला सराव करण्याची इच्छा नव्हती.”, असं गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्त पत्रकार परिषद टाळली या बातम्याही बीसीसीआयच्या एका सूत्राने फेटाळून लावल्य आहेत.