IPL 2024 | आयपीएलबाबत मोठी अपडेट, 17 वा मोसम भारताबाहेर?
क्रिकेट चाहत्यांची हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. आयपीएल 17 व्या मोसमाचं आयोजन हे भारतात होणार नाही? जाणून घ्या
मुंबई | आयपीएल 16 वा मोसम मोठ्या दिमाखात पार पडला. चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट टीमने गुजरात टायटन्सवर शेवटच्या बॉलवर विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. चेन्नईने यासह मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता आयपीएलच्या आगामी 17 व्या मोसमाला अजून बरेच महिने बाकी आहेत. मात्र त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या या 17 व्या मोसमाचं आयोजन हे भारतात होणार नसून परदेशात पार पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. आयपीएलचा आगामी मोसम भारतात न होण्यामागच्या चर्चेचं कारण आपण जाणून घेऊयात.
देशात 2024 साली लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. आयपीएल स्पर्धा आणि लोकसभा निवडणुका या मार्च ते मे दरम्यान होणार असल्याची शक्यता आहे. स्पोर्ट्स तकनुसार, बीसीसीआय सूत्रांनी सांगितलंय की सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल 17 वा मोसमाचं आयोजन हे नेहमी पेक्षा लवकर किंवा गरज पडल्यास परदेशात आयोजित केलं जाऊ शकतं.
रिपोर्टनुसार, भारतात आयपीएलचं आयोजन करण्यासाठी स्पर्धेला लवकर सुरुवात करण्याचा पर्याय चाचपडून पाहिला जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएल 17 वा मोसम मे पर्यंत संपवण्याचं प्रयत्न बीसीसीआयचा आहे. मात्र आयपीएलला अजून बराच वेळ आहे. सध्या सर्वांचं लक्ष हे वर्ल्ड कपकडे लागलं आहे.
तर कुठे होणार आयोजन?
रिपोर्टनुसार, गरज पडल्यास भारताबाहेर आयपीएल स्पर्धेचं आयोजन इतर देशात केलं जाईल. मात्र भारतातचं आयपीएल 17 व्या मोसमाचं आयोजन व्हावं यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असेल. मात्र त्यानंतरही जर शक्यच झालं नाही, तर नाईलाजाने परदेशात आयपीएल स्पर्धेचं आयोजन करावं लागेल. याआधीही आयपीएल आणि निवडणुका या दोन्ही गोष्टींचं यशस्वीपणे मॅनेज करण्यात आलं आहे. तसाच प्रयत्न यंदाही असेल, असंही सूत्रांनुसार या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान याआधी अनेकदा आयपीएल स्पर्धेचं आयोजन हे भारताबाहेर करण्यात आलंय. आयपीएलच्या दुसऱ्या मोसमाचं आयोजन (IPL 2009) हे लोकसभा निवडणुकांमुळे दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. तर 2020 मध्ये कोरोनामुळे यूएईत आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली होती.