SRH vs GT : गुजरातचा सलग दुसरा सामना पावसामुळे वाया, कॅप्टन शुबमनचं ट्विट व्हायरल
Shubman Gill Tweet SRH vs GT Rain : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना पावसामुळे वाया गेला. या सामन्यानंतर गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल याने केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 65 वा सामना सनराजर्स हैदरबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार होता. सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये पार पडणार होता. मात्र पावसाने गेम केला. पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. अनेक तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना समसमान 1-1 गुण देण्यात आला. सामना रद्द होणं हैदराबादच्या पथ्यावर पडलं. हैदराबादचे 1 गुणासह एकूण 15 पॉइंट्स झाले. हैदराबाद यासह प्लेऑफमध्ये पोहचणारी तिसरी टीम ठरली.
तसेच दुसऱ्या बाजूला गुजरातचं नशिब फुटकं निघालं. गुजरातचा हा सलग दुसरा सामना वाया गेला. याआधी केकेआर विरुद्धचा सामना अशाच प्रकारे पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गुजरातचं आव्हान संपुष्टात आलं. आता गुजरातचा हैदराबाद विरुद्धचा आपल्या अखेरच्या साखळी फेरीतील सामन्याचा शेवट विजयाने करण्याचा मानस होता. मात्र सामना हा रद्द झाला. शुबमन गिलने या हंगामातून कर्णधार म्हणून पदार्पण केलं. त्यामुळे आपल्या नेतृत्वात संघाला विजयी करण्याचा प्रयत्नही शुबमनचा होता. मात्र तसं पावसामुळे होऊ शकलं नाही. सामना रद्द झाल्यानंतर गुजरातच्या सर्व खेळाडूंनी हैदराबादच्या स्टेडियममधील उपस्थित क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. शुबमनने आपल्या सहकाऱ्यांसोबतचा फोटो ट्विट करत आपलं मनातलं सर्वकाही शेअर केलंय.
शुबमन गिलने ट्विटमध्ये काय म्हटलं?
“स्पर्धेतील शेवट अशाप्रकारे होईल,अशी आशा नव्हती, पण हा हंगाम शिकण्याच्या हिशोबाने आणि काही छान आठवणींनी भरलेला राहिला. मी 3 वर्षांपासून या सुंदर कुटुंबाचा एक भाग आहे आणि हा एक प्रवास आहे जो मी कधीही विसरणार नाही. मला त्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि कठीण काळात आम्हाला प्रेम दिलं. आवा दे!”, असं ट्विट शुबमन गिलने सामना रद्द झाल्यानंतर केलं.
सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.