IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सशी प्लेऑफमध्ये कोण करणार सामना? जाणून घ्या संघातील चुरस आणि गणित
आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफमधील तीन संघाची जागी पक्की झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यापैकी एक संघ चौथा संघ ठरणार आहे. पण गुणतालिकेत टॉपला असलेल्या संघाशी कोण भिडणार? याची उत्सुकता लागून आहे. तीन संघांमध्ये याची चुरस असणार आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफमध्ये तीन संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स टॉपला असणार हे आता पक्कं झालं आहे. कोलकाता नाईट रायडर्स 19 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. त्यामुळे क्वॉलिफायरच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स या संघाशी कोण भिडणार याची उत्सुकता आहे. कारण टॉपला असलेल्या दोन संघांना पराभूत झालं तरी प्लेऑफमध्ये दुसरी संधी मिळते किंवा जिंकला तर थेट अंतिम फेरीत स्थान मिळते. त्यामुळे दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्यासाठी तीन संघांमध्ये चुरस आहे. राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये चुरस आहे. राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या स्थानी जाण्याची चांगली संधी आहे. राजस्थान रॉयल्सचे 16 गुण असून शेवटचा सामना शिल्लक आहे. या सामन्यात विजय मिळवला तर 18 गुण होतील आणि दुसरं स्थान पक्कं होईल. पण राजस्थान रॉयल्सचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघालाही दुसऱ्या स्थानावर येण्याची संधी आहे. सध्या हैदराबादचे 15 गुण असून शेवटचा सामना जिंकला तर 17 गुण होतील. पण यासाठी राजस्थान रॉयल्स संघाने पराभूत होणं गरजेचं आहे. राजस्थानने शेवटचा सामना जिंकला तर हैदराबादला तिसऱ्या स्थानावर राहावं लागेल. कारण सामना जिंकला तरी 17 गुण होतील. सनरायझर्स हैदराबादचा शेवटचा सामना पंजाब किंग्सशी होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफमधील स्थान अजूनही पक्कं नाही. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करताच टॉप 4 संघात मोठी उलथापालथ होती. चेन्नई सुपर किंग्सला दुसऱ्या स्थानावर येण्याची संधी आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सचा नेट रनरेट हैदराबाद आणि राजस्थानपेक्षा चांगला आहे. पण हैदराबाद आणि राजस्थानने शेवटचा सामना गमवणे तितकंच गरजेचं आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नेट रनरेटसह चेन्नईला पराभूत केलं तर चौथ्या स्थानी राहील. आरसीबीला टॉप 2 मध्ये जाण्याची संधी नाही.