मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज मिनी ऑक्शनमध्ये कोट्यवधींची उधळण करून खेळाडूंना घेतलं आहे. त्यात मुंबई इंडियन्सनने ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला संघाची जबाबदारी सोपवली. रोहित शर्माला सूतासारखं बाजूला केल्याने बराच वाद झाला. आता एक एक करून या प्रकरणावरील पडदा दूर होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचरने यामागचं खरं कारण सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सच्या हेड कोचने सांगितलं की, ‘रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा आणि त्यासाठी त्याला कर्णधारपदावरून दूर सारण्यात आलं आहे.’ मार्क बाउचरने स्मॅश पॉडकास्टवर यामागची खरी कारणं सांगून टाकली आहेत.
“माझ्या मते, हा पूर्णपणे क्रिकेटशी निगडीत निर्णय आहे. आम्ही हार्दिक पांड्याला संघात आणण्यासाठीचा प्रकार पाहिला आहे. हा एक ट्रांजिशन फेज आहे. भारतातील बऱ्याच लोकांना याबाबत समज नाही. लोकं खूपच भावनिक होतात पण काही वेळेस भावना दूर ठेवणं गरजेचं आहे. मला वाटतं हा फक्त क्रिकेटशी निगडीत निर्णय आहे. एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा ग्रेट आहे. तसेच आपल्या कामगिरीने सर्वांना आनंद देईल. त्याला त्याच्या फलंदाजीचा आनंद घेऊ द्या आणि चांगल्या धावा करू द्या.”, असं हेड कोच मार्क बाउचर म्हणाला.
“रोहित शर्मा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्णधारपद भूषवत आहे. मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. आता भारताचं नेतृत्वही करत आहे. तो खूपच व्यस्त आहे. मागच्या काही पर्वात त्याची फलंदाजी हवी तशी झाली नाही. पण एक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे.”, असं मार्क बाउचर पुढे म्हणाला.
“टीम इंडियाचं कर्णधारपद असल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. पण आयपीएलमध्ये खेळेल तेव्हा त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी नसेल. त्यामुळे रोहित शर्माचा सर्वोत्तम खेळ पाहण्याची संधी मिळेल. मला त्याला मुंबई इंडियन्ससोबत आनंदाने खेळताना पाहायचं आहे.”, असंही मार्क बाउचर यांनी पुढे सांगितलं.