IPL 2025 : लखनौच्या ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीबाबत व्यक्त केल्या अशा भावना, म्हणाला..
आयपीएल मेगा लिलावानंतर सर्वच संघांचा चेहरामोहरा बदलला आहे. इथला खेळाडू तिथे आणि तिथला खेळाडू इथे अशी परिस्थिती आहे. पण या लिलावात सर्वांच्या नजरा या ऋषभ पंतकडे खिळल्या होत्या. अखेर 27 कोटींचा भाव घेत ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्स संघासोबत गेला आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. दोन दिवस चाललेल्या या मेगा लिलावात अपेक्षेप्रमाणे ऋषभ पंत सर्वाधिक भाव खाऊन गेला. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रस्सीखेंच पाहायला मिळाली. पण लखनौ सुपर जायंट्सने बाजी मारली. दिल्ली कॅपिटल्सने आरटीएम कार्डचा वापर केला पण 27 कोटींची रक्कम बोलून लखनौने धक्का दिला. त्यामुळे 27 कोटींची सर्वाधिक बोली घेत ऋषभ पंत लखनौच्या ताफ्यात दाखल झाला आहे. खरं तर दिल्ली कॅपिटल्सला ऋषभ पंतची आवश्यकता होती तर रिलीज का केलं? त्याला रिटेन करता आलं असतं. तसेच पैशांची काहीच अडचण नसल्याचंही ऋषभ पंतने सोशल मीडियावर एका व्हिडीओला उत्तर देताना स्पष्ट केलं होतं. पण 9 वर्षानंतर ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्स यांची नाळ तुटली आहे.त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने तगडा खेळाडू गमवल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंतने खास मेसेज देत फ्रेंचायझीचा निरोप घेतला आहे. ऋषभ पंतने पूर्ण प्रवासाचं वर्णन करत एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिलं की, “निरोप घेणं कधीही सोपं नसतं. दिल्ली कॅपिटल्ससोबत प्रवास आश्चर्यापेक्षा कमी नव्हता. मैदानातील रोमांचक क्षण ते बाहेर घालवलेली प्रत्येक गोष्ट, मी ज्या पद्धतीने घडलो, मी त्याची कल्पनाही कधी केली नव्हती. मी एक लहान खेळाडू म्हणून आलो होतो आणि मागच्या 9 वर्षात आम्ही एकत्र मोठे झालो आहेत.”
‘चाहत्यांनो, हा प्रवास सार्थकी लावणारे तुम्ही आहात. तुम्ही मला जवळ घेतलं, मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात तु्म्ही माझ्यासोबत उभे राहिलात. मी पुढे जात असताना तुमचं प्रेम आणि पाठिंबा कायम माझ्या हृदयात ठेवेन. मी जेव्हा कधी मैदानात जाईन तेव्हा मी तुमच्या मनोरंजनासाठी तिथे असेन. माझ्या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी तुमचे खूप आभार. हा प्रवाश खूप खास आहे.’, असं ऋषभ पंतने पुढे लिहिलं आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा संघ : निकोलस पूरन, आयुष बडोनी, मयंक यादव, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई, ऋषभ पंत, आवेश खान, डेव्हीड मिलर, एडन मार्करम, मिचेल मार्श, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंह, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंह, शाहबाज अहमद, आकाश सिंह, शामर जोसेफ, प्रिंस यादव, युवराज चौधरी, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीत्जके, राजवर्धन हंगरगेकर.