MI vs KKR : केकेआर वानखेडेत पॅकअप, अश्विनी कुमारसमोर कोलकाताचे दिग्गज ढेर, पलटणसमोर 117 धावांचं आव्हान
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders 1st Innings : मुंबईच्या गोलंदाजांनी घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सला 116 धावांवर गुंडाळलं आहे. डेब्यूटंट अश्विनी कुमार याने पदार्पणात 4 विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधलं.

मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 18 व्या मोसमात सलग 2 पराभवानंतर घरच्या मैदानात परतताच सूर गवसला आहे. मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध धमाकेदार कामगिरी केली आहे. केकेआरचे क्विंटन डी कॉक, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे, आंद्रे रसेल आणि रिंकु सिंह यासारखे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. कोलकाता नाईट रायडर्सला वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईच्या धारदार बॉलिंगसमोर पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलेलं नाही. मुंबईने केकेआरला 16.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर गुंडाळलं आहे. डेब्यूटंट अश्विनी कुमार याने केकेआरला गुंडाळण्यात मुख्य भूमिका बजावली. अश्विनीने पदार्पणात 4 विकेट्स घेतल्या. तसेच इतर गोलंदाजांनीही चांगलं योगदान दिलं. त्यामुळे आता मुंबईला पहिल्या विजयासाठी 117 धावा करायच्या आहेत.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हार्दिकचा हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक ठरवला. केकेआरची पावरप्लेमध्ये दुर्दशा झाली. पलटणने केकेआरला पावरप्लेमध्ये 4 झटके दिले. सुनील नारायण याला भोपळाही फोडता आला नाही. क्विंटन डी कॉक 2 रन करुन आऊट झाला. कॅप्टन आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे 11 धावा करुन माघारी परतला. तर उपकर्णधार वेंकटेश अय्यर 3 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे केकेआरची 5.4 ओव्हरमध्ये 41 रन्सवर 4 आऊट अशी स्थिती झाली होती. त्यामुळे केकेआरला लोकल बॉय अंगकृष रघुवंशीकडून अपेक्षा होती. अंगकृष त्यानुसार खेळत होता. मात्र त्याला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. हार्दिक पंड्याने अंगकृषला 26 रन्सवर आऊट केलं.
केकेआरची फार वाईट स्थिती झाली होती. मात्र केकेआरच्या आशा कायम होत्या. रिंकु सिंह, मनिष पांडे आणि आंद्रे रसेल हे त्रिकुट असल्याने हे केकेआरचा डाव सावरतील, अशी आशा केकेआर चाहत्यांना होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी या तिघांनाही मोठी खेळी करण्यापासून रोखलं. रिंकु सिंग 17, मनिष पांडे 19 आणि आंद्रे रसेल 5 रन्स करुन झाला. त्यामुळे केकेआर 100 धावांच्या आत ऑलआऊट होणार असं वाटत होतं. मात्र अखेरच्या क्षणी रमनदीप सिंह याने केलेल्या खेळीमुळे केकेआरला 100 पार मजल मारता आली. रमनदीप सिंह याने 12 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह 22 रन्स केल्या. तर हर्षित राणाने 4 धावांचं योगदान दिलं. तर स्पेन्सर जॉन्सन 1 धावेवर नाबाद परतला.
मुंबईची बॉलिंग
मुंबईसाठी एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. या 6 गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र डेब्यूटंट अश्विनी कुमार याने आपली छाप सोडली. अश्विनीने 3 ओव्हरमध्ये 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. दीपक चाहर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर ट्रेन्ट बोल्ट, हार्दिक पंड्या, विघ्नेश पुथुर आणि मिचेल सँटनर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.