IPL 2025 : पंजाबला पहिल्या सामन्याआधीच धक्का;नंबर 1 Odi ऑलराउंडर मुकणार!
Ipl 2025 Punjab Kings: पंजाब किंग्सने या घातक ऑलराउंडरला 2 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं. मात्र या ऑलराउंडरला सुरुवातीच्या सामन्यात खेळणार येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमाला शनिवारी 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळरु आमनेसामने असणार आहेत. तर पंजाब टीम या मोहिमेतील पहिला सामना हा 25 मार्चला गुजरातविरुद्ध खेळणार आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे. मात्र त्याआधी पंजाब किंग्ससाठी वाईट बातमी समोर आली आहे. वनडे क्रिकेटमधील नंबर 1 ऑलराउंडर अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह ओमरझई याला पहिल्या सामन्याला मुकावं लागू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अझमतुल्लाह याने वैयक्तिक कारणामुळे सुरुवातीच्या सामन्यात खेळता येणार नसल्याचं टीम मॅनेजमेंटला कळवलंय.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर अनेक संघाचे खेळाडू हे आयपीएल स्पर्धेसाठी मायदेशातून भारतात दाखल झाले आहेत. काही खेळाडू हे टीमसह सामील झाले आहेत. मात्र अझमतुल्लाह ओमरझई पंजाब किंग्ससह केव्हा जोडला जाणार? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
“अझमतुल्लाह ओमरझई कौटुंबिक कारणामुळे पंजाब टीमसह उशिराने जोडला जाणार आहे. टीममधील इतर विदेशी खेळाडू आजपासून (17 मार्च) गोटात दाखल होत आहेत”, अशी माहिती मीडिया रिपोर्टमध्ये दिली आहे.
उमरान मलिक आऊट
दरम्यान दुसऱ्या बाजूला कोलकाताचा वेगवान गोलंदाज ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक याला दुखापतीमुळे 18 व्या मोसमातून माघार घ्यावी लागली आहे. उमरान याच्या जागी चेतन साकरिया याचा समावेश करण्यात आला आहे.
श्रेयस अय्यरकडे नेतृत्व
दरम्यान 17 व्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या श्रेयस अय्यर याला पंजाबचा कर्णधार करण्यात आलं आहे. श्रेयसने आपल्या नेतृत्वात 17 व्या हंगामात (Ipl 2024) कोलकाताला 12 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. मात्र पंजाबने मेगा ऑक्शनमधून श्रेयसला आपल्या गोटात घेतलं आणि कर्णधारपदही दिलं. त्यामुळे पंजाबच्या चाहत्यांना श्रेयसकडून कर्णधार आणि फलंदाज म्हणून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी पंजाब किंग्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस आणि मार्को यानसन.