आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी चार कर्णधारांना धक्का, विजयी संघाचा कॅप्टन संघातून आऊट
आयपीएल रिटेन्शन खेळाडूंची यादी अखेर बाहेर आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पण या रिटेन्शन यादीत काही धक्कादायक माहिती समोर आली. कारण चार कर्णधारांना रिलीज करण्यात आला आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंबाबत चर्चा सुरु होत्या. कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणाला रिलीज करणार हा प्रश्न अनेकदा विचारला जात होता. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. कारण दहाही फ्रेंचायझींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीतून चार दिग्गज कर्णधारांना रिलीज केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आयपीएल चाहत्यांना धक्का बसला आहे. सर्वात महत्त्वाचं दिल्ली कॅपिटल्सने इन फॉर्म ऋषभ पंतला रिलीज केलं आहे. तसेच मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिलेल्या श्रेयस अय्यरला रिलीज करण्यात आलं आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार फ्रेंचायझीसोबत राहिल की नाही या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. कारण केएल राहुलला फ्रेंचायझीने रिलीज केलं आहे. तर आरसीबीची धुरा खांद्यावर असलेल्या फाफ डु प्लेसिसला फ्रेंचायझीने सोडलं आहे. त्यामुळे या चारही संघासाठी नवे कर्णधार मिळणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा जेतेपद मिळवलं आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन वेळा, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात एकदा जेतेपद मिळवलं आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स संघात मागच्या काही दिवसात बरीच उलथापालथ झाली आहे. गौतम गंभीरने मार्गदर्शक पद सोडलं आणि भारतीय संघाची कास धरली आहे. इतकंच काय स्टाफमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे संघ श्रेयस अय्यरला रिलीज करणार नाही असं वाटत होतं. पण कोलकाता फ्रेंचायझीने श्रेयस अय्यरला रिलीज केलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्ससोबत दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कर्णधारांना रिलीज केलं आहे. कोलकाता सोडलं तर इतर तीन संघांनी अजूनही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यामुळे पुढच्या पर्वात या चारही संघासाठी नवे कर्णधार असणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीच्या खांद्यावर येऊ शकते. आता आयपीएल मेगा लिलावात आता कोणत्या खेळाडूवर किती रक्कम मोजली जाते याची उत्सुकता लागून आहे.