RR vs CSK : राजस्थानचा पहिला विजय, चेन्नईवर 6 धावांनी मात, ऋतुराजचं अर्धशतक व्यर्थ

Rajasthan Royals vs Chennai Super Kings 11th Match Result : राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 176 रन्सच करता आल्या.

RR vs CSK : राजस्थानचा पहिला विजय, चेन्नईवर 6 धावांनी मात, ऋतुराजचं अर्धशतक व्यर्थ
rr vs csk match result ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 31, 2025 | 12:58 AM

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. राजस्थानने सलग 2 सामने गमावल्यानंतर घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) खेळताना पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानने चेन्नईला गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 63 धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईला विजयाची आशा होती. मात्र रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी ही जोडी अखेरच्या क्षणी चेन्नईला विजयी करण्यात अपयशी ठरली. या जोडीने चेन्नईला अनेकदा अशक्य वाटणाऱ्या सामन्यात विजयी केलंय. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या. राजस्थान अशाप्रकारे विजयी झाली.

चेन्नईची बॅटिंग

चेन्नईने धावांचं खातं उघडण्याआधी विकेटचं खातं उघडलं. रचीन रवींद्र झिरोवर आऊट झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी 23 धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईची 2 बाद 46 अशी स्थिती झाली. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे या दोघांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार रियान पराग याने अप्रतिम कॅच घेत शिवम दुबे याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रियान परागने शिवमचा घेतलेला कॅच निर्णायक ठरला. शिवम 18 धावांवर बाद झाला. राजस्थान चेन्नईला ठराविक अंतराने झटके देतच होती. शिवमनंतर विजय शंकर 9 रन्स करुन माघारी परतला. मात्र ऋतुराजने एक बाजू धरुन ठेवली होती. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना आशा होती. मात्र ऋतुराज गायकवाड हा देखील ऐन क्षणी आऊट झाला. ऋतुराजने 44 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 63 धावा केल्या.

..आणि धोनी मैदानात

धोनी मैदानात आला तेव्हा चेन्नईला विजयासाठी 25 बॉलमध्ये 54 धावांची गरज होती. तर रवींद्र जडेजा मैदानात होता. त्यामुळे ही अनुभवी जोडी चेन्नईला विजयी करेल, अशी आशा होती. मात्र या दोघांना तसलं काही जमलं नाही. धोनी 20 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 16 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतरही चेन्नईला विजयाची संधी होती. मात्र अखेर राजस्थान चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 176 रन्सवर रोखण्यात यशस्वी ठरली. रवींद्र जडेजा 22 बॉलमध्ये 32 रन्सवर नॉट आऊट परतला. तर जेमी ओव्हरटन 11 धावांवर नाबाद परतला. राजस्थानसाठी वानिंदू हसरंगा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

राजस्थानने विजयाचं खातं उघडलं

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथिराना आणि खलील अहमद.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.