RR vs KKR: रियान परागसमोर आता अजिंक्य रहाणेच्या टीमचं आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांची पराभवाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. असं असताना मागची आकडेवारी पाहता या दोन्ही संघांची कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊयात..

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी आतुर असतील. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघाला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने 7 विकेटने पराभूत केले. तर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स संघाची पिसं काढली. सर्वाधिक धावसंख्या असलेल्या सामन्यात 44 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वसुली दुसऱ्या सामन्यात करण्याचा मानस दोन्ही संघांचा आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ किती वेळा आमनेसामने आले आहेत आणि कोणत्या संघाचं पारडं जड राहिलं आहे ते जाणून घेऊयात
आतापर्यंत आयपीएल इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स 29 वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणजे दोन्ही तूल्यबळ आहेत असाच अर्थ निघत आहे. तर एक सामना निकालाविना संपला आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ भिडणार होते. पण पावासामुळे हा सामना झाला नाही. त्यामुळे हेड टू हेड आकडेवारी पाहता या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण 4 सामने झाले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला एकदा विजय मिळाला आहे. तर धावांचा पाठलाग करताना दोन विजय आहेत. तर एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. नाणेफेक जिंकणारी टीम इथे एकही सामना जिंकली नाही हे विशेष आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.