SRH vs RR : राजस्थान रॉयल्सची सनरायझर्स हैदराबादपुढे शरणागती, 44 धावांनी पराभव
आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सची पिसं काढली. आक्रमक खेळी करत 286 धावा केल्या. विजयासाठी दिलेलं हे आव्हान आवाक्याबाहेर होतं. राजस्थानचा संघ फक्त 242 धावा करू शकला आणि 44 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

आयपीएल 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव दिसला. नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण सनरायझर्स हैदराबादचा बॅटिंग लाईनअप पाहता मोठी धावसंख्या होणार याचा अंदाज होता. झालंही तसंच… अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशन नावाचं वादळ घोंगावलं. त्याने 47 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या. तर ट्रेव्हिस हेडने 31 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 286 धावा केल्या आणि 287 धावा विजयासाठी दिल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा डाव गडगडला. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 6 गडी गमवून 242 धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सचा या सामन्यात 44 धावांनी पराभव झाला. त्यामुळे नेट रनरेटवर त्याचा विपरीत परिणाम होणार हे निश्चित आहे.
विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग स्वस्तात बाद झाले. यशस्वी जयस्वाल फक्त 1 धाव, तर रियान पराग 4 धावा करून बाद झाले. नितीश राणाकडून अपेक्षा होत्या. मात्र तोही काही खास करू शकला नाही. त्याचा डाव 11 धावांवर आटोपला. त्यानंतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी डाव सावरला. संजू सॅमसनने 26 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यावेळी त्याने 6 चौकार आणि तीन षटकार मारले. संजू सॅमसननंतर ध्रुव जुरेलने अर्धशतकी खेळी केली. पण दोघं बाद झाल्यानंतर राजस्थानचा पराभव निश्चित झाला. संजू सॅमसन 66, तर ध्रुव जुरेल 70 धावा करून बाद झाला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.