IPL 2025 , SRH vs LSG : सनरायझर्स हैदराबादचं लखनौ सुपर जायंट्समोर विजयासाठी 191 धावांचं आव्हान
आयपीएल 2025 स्पर्धेतील सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौने जिंकला आणि ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने हैदराबादला 190 धावांवर रोखलं.

आयपीएल 2025 सर्वात घातक टीम म्हणून सनरायझर्स हैदराबादकडे पाहिले जातं. बॅटिंग लाइनअप पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. पण लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादसमोर भेदक गोलंदाजी केली. आक्रमक खेळण्याची फार संधी दिली नाही. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच 191 धावांचं आव्हान विजयासाठी दिलं आहे. या सामन्यात शार्दुल ठाकुरने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. शार्दुल ठाकुरने घातक अशा दोन खेळाडूंना बाद केलं. अभिषेक शर्मा 6 धावांवर असताना शार्दुलने त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर पहिल्या सामन्यात शतक ठोकलेला इशान किशनला पहिल्याचं चेंडूवर तंबूत धाडलं. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. दुसरीकडे, ट्रेव्हिस हेडसाठी आखलेलं चक्रव्यूह योग्य पद्धतीने राबवलं गेलं. त्याला फार काही करता आलं नाही. आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वारंवार जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला दोन जीवदान मिळालं. पण 47 धावांवर असताना प्रिंस यादवने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. हेनरिक क्लासेन तर कमनशिबी ठरला. नॉनस्ट्राईकला उभा असताना फॉलोथ्रूमध्ये रनआऊट झाला. त्याचा खेळ 26 धावांवर आटोपला. नितीश कुमार रेड्डी मैदानात तग धरून होता. पण 32 धावांवर असताना रवि बिश्नोईने त्याचा त्रिफळा उडवला.
शार्दुल ठाकुरने या सामन्यात जबरदस्त स्पेल टाकला. त्याने पॉवर प्लेमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या. शार्दुल ठाकुरने 4 षटकात 34 धावा देत 4 गडी बाद केले. तर आवेश खान, दिग्वेश राठी, रवि बिश्नोई आणि प्रिंस यादवने प्रत्येकी एक विकेट काढली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव